EPFO 3.0 UPI ATM: PF ची रक्कम काढणे ही एक वेळ खाऊ प्रक्रिया आहे. त्यासाठी अर्जफाटे करावे लागतात. इतके करूनही रक्कम तातडीने हाती येईल असे नाही. त्यासाठी 15 दिवस ते त्यापेक्षा अधिकचा कालावधी लागू शकतो. पण आता हा लवकरच सर्व इतिहास असेल. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) डिजिटल पाऊल टाकले आहे. त्याला ईपीएफओने ‘EPFO 3.0’ असे नाव दिले आहे. या नवीन व्यवस्थेतंर्गत पीएफ खातेदारांना आता सहज पीएफ काढता येईल. पीएफ खात्यातून रक्कम थेट एटीएम (ATM) अथवा युपीआयच्या (UPI)माध्यमातून काढता येईल.
PF काढण्यासाठी नवीन डिजिटल क्रांती
ईपीएफओचा मुख्य उद्देश हा संपूर्ण सिस्टिम लवकरात लवकर डिजिटल करणे हा आहे. या दिशेने ‘EPFO 3.0’ हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या अपग्रेडनंतर खातेदारांना बँकिंग सारख्या जलद सुविधा मिळतील. त्यांना पीएफ काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज फाटे करावे लागणार नाहीत. तर पीएफ खात्यातून काढण्यासाठी मंजूरीची गरज नसेल. ही नवीन व्यवस्था अत्यंत पारदर्शक आणि जलद करण्याचा प्रयत्न सुरू आहे. गेल्या ऑगस्ट महिन्यात ही सुविधा सुरू करण्यात येणार होती. पण तांत्रिक बाबी तपासण्यात आणि प्रायोगिक तत्वावर त्याची चाचणी करण्यासाठी वेळ घेण्यात आला आहे.
PF ATM Card, UPI च्या माध्यमातून असा काढा पैसा
पीएफ खात्याशी संबंधित सर्वच सेवा डिजिटल होतील. ईपीएफओ खातेदारांसाठी एक विशेष PF ATM Card आणण्याच्या विचारात आहे. हे एटीएम कार्ड इतर डेबिट कार्डसारखेच असेल तुमच्या जवळच्या एटीएम मशीनवर जाऊन तुमच्या गरजेनुसार आणि नियमानुसार तुम्हाला पीएफ रक्कम काढता येईल. तर पीएफ खाते हे युपीआय खात्यांशी (UPI) जोडले जाणार आहे. तर ईपीएफओ पोर्टल आणि उमंग (UMANG) ॲपच्या माध्यमातून बँक खात्यातून पैसा हस्तांतरीत करणे अधिक सोपे होईल.
तर या खात्यातून किती रक्कम एटीएम आणि युपीआय सेवेद्वारे काढता येतील याची चर्चा सुरू आहे. सुरुवातीच्या माहितीनुसार, ईपीएफओ एटीएम वा युपीआयच्या माध्यमातून पीएफ काढण्यासाठी एक निश्चित मर्यादा ठरवेल. सध्याच्या माहितीनुसार, खात्यातील एकूण रक्कमेच्या 50 ते 75 टक्के रक्कम या माध्यमातून काढता येईल. तर भविष्यात यामध्ये अजून काही मोठे बदल होण्याची शक्यता आहे. अर्थात याविषयीची अधिकृत माहिती ईपीएफओ जाहीर करेल.
केव्हा सुरू होईल ही सुविधा
EPFO 3.0 या एप्रिल अथवा पुढील मे महिन्यात सुरू होण्याची शक्यता होती. पण सध्या अजूनही काही तांत्रिक चाचण्या बाकी असल्याने आणि सुरक्षित पेमेंट प्रणालीसाठी अजून काही कालावधी लागण्याची शक्यता आहे. तर यासाठी मोबाईलवर नवीन EPFO 3.0 ॲप्लिकेशन येण्याची ही शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे खातेदारांनाक्यूआर कोडच्या मदतीने सहज रक्कम काढता येईल. तसेच एटीएमवरही क्यूआर कोड स्कॅन करून रक्कम काढता येईल.