पिंपरी, ता.१८ ः ‘इज ऑफ लिव्हिंग’ कार्यक्रमांतर्गत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी इयत्ता अकरावीची केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार आहे. तिच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून आकुर्डीतील डॉ. डी. वाय. पाटील कनिष्ठ महाविद्यालयात एक विशेष नोंदणी व मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले.
या शिबिरात सहाय्यक संचालक ज्योती परिहार यांनी महाविद्यालयांच्या प्रतिनिधींना मार्गदर्शन केले. पिंपरी चिंचवडमधील सर्व अनुदानित, अंशतः अनुदानित व स्वयंअर्थ सहाय्यित उच्च माध्यमिक विद्यालयांनी जर ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी तसेच मूळ कागदपत्रांची पूर्तता वेळेवर न केल्यास, प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्यास तसेच संपूर्ण प्रवेश प्रक्रियेदरम्यान कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार किंवा नियमांचे उल्लंघन करताना आढळल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा शिक्षण विभागातर्फे देण्यात आला आहे. या मोहिमेमुळे अकरावी प्रवेश प्रक्रियेत सुसूत्रता येईल आणि पालकांसह विद्यार्थ्यांचा त्रास कमी होईल, असा विश्वास शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे.
PNE26W12686