Tiger Terror : वारखेडचा वाघ मानवी वस्तीत; वारी परिसरात गाढवाची शिकार
esakal April 18, 2026 08:45 PM

हिवरखेड, तेल्हारा - वारखेड परिसरात काही दिवसांपासून धुमाकूळ घालणारा वाघ आता वारी येथील मानवी वस्तीत शिरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शनिवारी (दि. १८) पहाटेच्या सुमारास वाघाने वारी गावाजवळील वस्तीत घुसून एका गाढवाची शिकार केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली असून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वारखेड शिवारात मागील काही दिवसांपासून वाघाने अनेक जनावरांवर हल्ले केले होते. शेतशिवारात फटाके फोडून आणि आवाज करून वाघाला हुसकावण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर हा वाघ अधिकच आक्रमक बनत मानवी वस्तीच्या दिशेने सरकला असल्याचे दिसून येत आहे.

वारी येथील रहिवाशांनी सांगितले की, पहाटे अचानक जनावरांच्या ओरडण्याचा आवाज आला. त्यानंतर परिसरात तपासणी केली असता एका गाढवाचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी वाघाचे ठसेही स्पष्ट दिसून आले. त्यामुळे हा हल्ला वाघानेच केल्याची खात्री ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

स्थानिक नागरिकांनी वन विभागाला तत्काळ माहिती दिली. संबंधित वनाधिकाऱ्यांनी पंचनामा करून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अहवाल पाठविल्याची माहिती मिळाली आहे. मात्र अद्यापही वाघाला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आलेला नाही किंवा रेस्क्यू मोहीम सुरू झालेली नाही, अशी तक्रार ग्रामस्थांकडून होत आहे.

'जोपर्यंत एखादी जीवितहानी होत नाही, तोपर्यंत वरिष्ठ अधिकारी गंभीरपणे दखल घेत नाहीत का?' असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत. शेतात काम करणारे शेतकरी, शाळकरी मुले तसेच सकाळ-संध्याकाळ फिरणारे नागरिक यांच्यात भीतीचे सावट आहे.

दरम्यान, वन विभागाने नागरिकांनी सतर्क राहावे, रात्री एकटे बाहेर पडू नये, जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत आणि वाघ दिसल्यास तात्काळ कळवावे, असे आवाहन केले आहे. तरीदेखील वाघाचा वाढता वावर लक्षात घेता तातडीने पिंजरा लावून त्याला जेरबंद करावे, अशी ठाम मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

मानवी वस्तीत वाघाच्या प्रवेशामुळे परिस्थिती गंभीर बनली असून वन विभागाने त्वरीत ठोस पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.