Loni Kalbhor Assault: तक्रार मागे न घेतल्याचा सूड : लोणी काळभोरमध्ये टेलरवर लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला, दोघांवर गुन्हा
esakal April 18, 2026 08:45 PM

लोणी काळभोर : यापूर्वी दिलेली तक्रार मागे घेतली नाही या कारणांवरून एकास लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करण्यात आली आहे. सदर घटना लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील खोकलाईदेवी चौकात शुक्रवार (१७ एप्रिल) रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

या घटनेत विलास रोहिदास जाधव (वय ४४) हे गंभीर जखमी झाले असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शरद अच्युत कदम (वय ३६) आणि राहुल अच्युत कदम (वय ३३, दोघेही रा. बाजारमळा, लोणी काळभोर) यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विलास जाधव हे टेलरिंग व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारांस मुलीची चप्पल तुटल्याने ती शिवून घेण्यासाठी ते दत्त मंदिर परिसराकडे जात होते. याच वेळी खोकलाई मंदिराजवळ अचानक चारचाकी गाडीतून आलेल्या शरद आणि राहुल कदम यांनी जाधव यांना अडवले. व दमदाटी करत, “तू आमच्याविरोधात दिलेली तक्रार मागे घे, नाहीतर तुला आणि तुझ्या मुलांना लोणी काळभोरमध्ये फिरू देणार नाही,” अशी धमकी दिली.

यांवर जाधव यांनी “मी कायदेशीर तक्रार केली आहे, पुढे जे होईल ते कायद्यानुसार होईल,” असे सांगितले. याचा राग आलेने दोघेही गाडीतून खाली उतरले आणि “तुला खूप मस्ती आली आहे,” असे म्हणत जाधव यांना पकडून दंड, पाठ आणि हातावर लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यामुळे ते गंभीर जखमी झाले.

जाधव यांचा पुतण्या सागर राजाभाऊ जाधव हा घटनास्थळी पोहोचला आणि त्याने हस्तक्षेप करत जाधव यांची सुटका केली. त्यानंतर दोघेही आरोपी तेथून पसार झाले. यानंतर जखमी अवस्थेत जाधव यांनी तत्काळ लोणी काळभोर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी पुण्यातील ससून रुग्णालयात पाठवले. तेथे उपचार घेतल्यानंतर त्यांनी तक्रार दाखल केली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.