>> डॉ. वंदना बोकील–कुलकर्णी
महाराष्ट्राला लाभलेल्या ज्ञानोपासकांच्या परंपरेतील महत्त्वाचं नाव म्हणजे दुर्गाबाई भागवत. सर्जनशील साहित्यकार आणि ज्ञानमार्गी संशोधक अशी बाईंची ठसठशीत ओळख मराठी साहित्यविश्वाला आहे. परखडपणा, वाद, चर्चा हेच जिवंतपणाचं लक्षण आणि मुक्तविचार हाच संस्कृतीचा मूलाधार मानणाऱ्या दुगाबाईंचे जीवन आणि लेखनकार्य मराठी भाषेला ललामभूत आहे.
दुर्गाबाई भागवत (10 फेब्रुवारी 1910- 7 मे 2002) यांना हे विशेषण महाराष्ट्रांतील काही विद्वानांनी दिलेलं आणि परखडपणा, वाद, चर्चा हेच जिवंतपणाचं लक्षण आणि मुक्तविचार हाच संस्कृतीचा मूलाधार मानणाऱ्या बाईंनी ते आनंदानं स्वीकारलेलं !
महाराष्ट्राला लाभलेल्या ज्ञानोपासकांच्या परंपरेतील महत्त्वाचं नाव म्हणजे दुर्गाबाई भागवत. मानववंशशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, बौद्ध धर्माच्या अभ्यासक, संस्कृत, पाली, बंगाली, जर्मन या भाषांत प्रवीण, आदिवासी जीवनाच्या भाष्यकार आणि ललित लेखक अशा बहूआयामी दुर्गाबाईंनी आपल्या प्रदीर्घ आयुष्यात विपुल लेखन केलं. स्वतंत्र लेखन, संशोधनपर लेखन, अनुवाद, अभ्यासप्रकल्प… सर्व त्रहेचं लेखन! एखाद्या माणसाच्या हातून इतकं प्रचंड काम होऊ शकतं, असा अचंबित करणारा हा लेखन प्रपंच आहे.
तरुण वयात गांधीजींच्या विचारांनी प्रेरित होऊन बाई राजकीय चळवळीत उतरल्या. एक पूर्ण वर्ष त्यांनी या राष्ट्रकार्याला सहजपणे दिल. नंतर मात्र म्हणजे 1931-32 पासून त्या व्रतस्थपणे जन्मभर ज्ञानोपासना करीत राहिल्या. ऐन तारुण्यात विषबाधेने आजारी झाल्यावर जीवनातील वैफल्याला हद्दपार करुन बाई अत्यंत रसरशीत जीवन जगल्या आणि ‘ऋतुपा‘सारख्या लेखनात विश्वचैतन्याचा सुंदर वेध घेतला. हिंदू आणि आदिवासी संस्कृतींच्या परस्परसंबंधांचा अभ्यास करण्यासाठी सागर, बिलासपूर, बजरघंटी, दुर्ग, रायपूर असा मध्यप्रदेशातील आदिवासी पट्टा त्यांनी त्या काळात अक्षरश पिंजून काढला. त्यावर आधारित त्यांचे शोधनिबंध एशियाटिक सोसायटी, फोकलोअर सोसायटी ऑफ इंडिया यांच्या नियतकालिकांतून प्रसिद्ध झाले.
1975 मध्ये क्रहाडला झालेल्या साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या. दुसऱ्या स्त्री अध्यक्ष! बिनविरोध निवडून आलेल्या. आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या संमेलनात बाईंचा परखडपणा आणि निर्भयपणा उठून दिसला. त्यांचा ‘दुर्गावतार’ साऱ्यांनी पाहिला. दुर्गाबाई खऱ्या स्वातंत्र्यवादिनी! पिंडानंच निर्भय. त्यांची निर्भयशीलता ही त्यांच्या प्रखर स्वातंत्र्यप्रेमाचीच दुसरी बाजू आहे. दुर्गाबाईंच्या काळात गोदावरी परुळेकर, गीता साने, इरावती कर्वे आणि मालतीबाई बेडेकर याही आपापल्या कर्तृत्त्वाने मोठ्या झालेल्या मोजक्या स्त्रिया समाजात वावरत होत्या.
सर्जनशील साहित्यकार आणि ज्ञानमार्गी संशोधक अशी बाईंची ठसठशीत ओळख मराठी साहित्यविश्वाला आहे. इंग्रजी आणि मराठीतून त्यांनी विपुल लेखन केलं. त्यात ‘केतकरी कादंबरी’सारखे समीक्षाग्रंथ, शासन, साहित्यिक आणि सामाजिक बांधिलकी सारखं वैचारिक लेखन, लोकसाहित्याची रूपरेखा, कदंब, अस्वल असं अगदी वेगळं लेखन आहे. चरित्रे, अनुवाद, कथासंग्रह आहेत. लोककथांची संकलनं, संपादनं आहेत. बाणाची कादंबरी, जातककथा सारखे अनुवाद प्रकल्प आहेत. अनेक शोधनिबंध आणि बालसाहित्यही आहे; पण मराठी साहित्याला त्यांचं अमूल्य देणं आहे ते ललितगद्याचं! अरुणा ढेरे यांनी म्हटल्याप्रमाणे ‘संपन्न सौंदर्यदृष्टी, निर्भय चिकित्सा, चौरस व्यासंग आणि संवेदनात्मक जीवनोत्सुकता‘ या त्यांच्या वृत्तिविशेषांमुळे ललितगद्यासारखा आत्मनिष्ठ लेखनप्रकार त्यांनी एका उंचीवर नेऊन ठेवला. अत्यंत रसरशीत, नानाविध संदर्भांनी फुलून आलेली आणि चिंतनशील असूनही भावोत्कटतेचा आविष्कार घडवणारी ‘ऋतुपा’, ‘भावमुद्रा’, ‘व्यासपर्व’, ‘रूपरंग’, ‘पैस’, ‘डूब’, ‘प्रासंगिका’, ‘लहानी’, ‘दुपानी’, ‘गोधडी’, ‘खमंग’ ही त्यांची ललितगद्याची पुस्तके म्हणजे रसिक, पंडिता, मनस्विनी, तेजस्विनी या विशेषणांना सार्थ ठरवणाऱ्या या ज्ञानमार्गी व्यक्तिमत्त्वाचे चैतन्यशील आविष्कार आहेत! शरीर आणि बुद्धीची साथ असेपर्यंत म्हणजे जवळजवळ आयुष्याच्या अखेरपर्यंत जीवनाविषयीचं कुतूहल आणि ज्ञाननिष्ठा लख्ख असणाऱ्या दुर्गाबाई यांचं जीवन आणि लेखनकार्य मराठी भाषेला ललामभूत आहे.
1956 मध्ये त्या तमाशा परिषदेच्या अध्यक्ष झाल्या. तमासगीर स्त्रिया, वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रिया यांच्यावर बाईंनी सखोल संशोधनपर काम करुन शासनाला अनेक विधायक सूचना केल्या. महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा नवकथा, नवकविता, कलेतील अश्लीलता, दलित साहित्य इत्यादी विषयांवर वाद निर्माण झाले त्या त्या वेळी बाईंनी नवेपणाला, आधुनिकतेला पाठिंबा दिला. नवे प्रयोग करणाऱ्या लेखकांकडे बाईंचं लक्ष असे.
“आयुष्यामध्ये मला कधीही रितेपणा वाटतच नाही. मी मोठी लेखक नसेनही; पण मी फार समाधानी लेखक आहे. मला हवं तसं, हवं तेवढं मी लिहिलं. लेखकाचं प्राक्तन मी सुखानं भोगू शकते. हे वरदान काय थोडं आहे?” असं त्या म्हणू शकल्या यातच त्यांच्या लेखकीय आयुष्याची सार्थकता आहे.
(लेखक समीक्षक, संपादक आहेत.)