देखणे न देखणे – कवितेचा चंद्र…
Marathi April 19, 2026 07:26 AM

>> डॉ. मीनाक्षी पाटील

जगताना आपल्याला येणारे अनुभव हे वैविध्यपूर्ण असतात. ते संवेदनेच्या, कल्पनेच्या स्तरावर, कधी वैचारिक स्तरावर, तर कधी या सर्वांच्या संमिश्रणातून येणाऱ्या या अनुभवांचे संवेदनशील मनावर ठसे उमटतात. ही विविध अनुभव बीजे मनात साठत सर्जनशील क्षणी या मनात साठलेल्या क्षणांचे, अनुभवांचे व्यक्तिविशेषत्व गळून पडतात आणि ते कवितेतून चैतन्यमय प्रतिमारूपात आविष्कृत होतात.

माणूस हा निसर्गाचाच एक घटक असल्यामुळे आदिम काळापासून मानवी जगण्यावर निसर्गपाचा, निसर्गनियमांचा फार मोठा परिणाम झाला आहे. निसर्गामध्ये दिवस-रात्र, जन्म-मृत्यू, ऋतुपाच्या लयबद्ध घटना सतत सुरू आहेत. ही लयबद्धता जशी बाह्य निसर्गात दिसते तशीच निसर्गाचा घटक असणाऱ्या मानवी शरीरातही दिसते. त्यामुळे मानवी जगण्याला एक आंतरिक लय प्राप्त झाली आहे.आदिम काळापासून ही आंतरिक लय मानवी भावविश्वाला व्यापून आहे.  अगदी लहानपणापासून अंगाईगीतं, बडबडगीतं, लोकगीतांच्या लयी आपल्याला भुरळ घालतात. त्या मनात घर करतात. परंपरागत लोकवाद्ये, लोकगीते, लोकनृत्याचा विचार करता किंवा कोणत्याही कलानिर्मितीचा विचार करता तिच्या मुळाशी मानवी स्वभावातील ही आदिम लयबद्ध क्रीडाप्रवृत्तीच असते.

जगभरच्या संस्कृती जरी वैविध्यपूर्ण वाटत असल्या तरी त्या संस्कृतींच्या मुळाशी असणारे मानवी मन मात्र सर्वत्र सारखेच आहे. त्यामुळेच वेगवेगळ्या संस्कृतींतील प्रतीकसृष्टी, आदिबंध, प्रतिमारूपे यांसारख्या अनेक गोष्टींमध्ये बऱ्याचदा साम्य आढळते. दैनंदिन जगण्यात माणसे जसे वास्तवात जगत असतो तसेच तो समांतररीत्या काल्पनिक स्तरावरही. सर्वसामान्य माणसे आणि कवीमनाची माणसे जरी एकाच जीवन वास्तवात जगत असली तरी त्यांचा त्या जीवन वास्तवाला दिलेला प्रतिसाद मात्र भिन्नभिन्न असतो. जीवन संघर्षातील त्यांच्या प्रतिक्रियांमध्ये मात्र मूलभूत फरक असतो. सामान्य माणसांची वृत्ती प्रामुख्याने दैनंदिन गरजांच्या पूर्तीमध्ये वा प्रेरणा समाधानाकडे वळलेली असते, तर कवीमनाची संवेदनशील वृत्ती साध्य साधनापलीकडे, जैविक प्रेरणांपलीकडे जाऊन कल्पनाशक्तीच्या सहाय्याने जीवनाचा अन्वयार्थ शोधत असते. तीव्र संवेदनशील वृत्तीमुळे कवीला बाह्य वास्तवापल्याडचे जसे प्रभावी दर्शन घडते तसेच अमूर्ताचेही.

दैनंदिन जीवनात कवी एक माणूस म्हणूनच अनेक अनुभव घेत असतो. त्या हरएक वेळी त्याचा काही काव्यनिर्मितीचा हेतू त्याच्या मनात नसतो. मात्र या वेगवेगळ्या अनुभवांचे त्याच्या संवेदनशील मनावर ठसे उमटतात, ती विविध अनुभव बीजे त्याच्या मनात साठत जातात. सर्जनशील क्षणी या मनात साठलेल्या क्षणांचे, अनुभवांचे व्यक्तिविशेषत्व गळून पडतात आणि ते कवितेतून  चैतन्यमय प्रतिमारुपात आविष्कृत होतात. अर्थात ही जी अनुभवाची रूपे प्रतिमा  प्रतीकांच्या माध्यमातून अवतरत असतात ती आरंभी धुसर व संदिग्ध भासतात. मनात साठलेल्या भावाशयातून एका पाठोपाठ अनेक प्रतिमा अवतरू लागल्या की, कवीच्या अंतर्मनातील काव्यात्म अनुभव आकार घेऊ लागतो. याचा अर्थ बाह्य वास्तवातून आलेले अनुभव मनात मुरल्यावर, त्याविषयी काही काळ चिंतन घडल्यावर जरी ते अनुभव कवीमनात जाणिवेच्या स्तरावर प्रत्यक्षात दृश्यमान नसले तरी ते नेणिवेत कुठेतरी दडलेले असतात. एखाद्या निर्णायक क्षणी जाणीव आणि नेणीव यांच्या संयोगातून ते कवितेच्या रूपात प्रकट होतात. अशा प्रकारे कवितेतील भावानुभूती केवळ वास्तवाशी, लौकिकाशी जोडलेली नसते तर ती कवीच्या जाणिवानेणिवांनी प्रतिभासित अशी असते.

थोडक्यात कवी आपल्या कवितेतून वास्तवाच्याच पार्श्वभूमीवर एका प्रातिभासिक विश्वाची निर्मिती करतो. सर्वसामान्य माणसे व कवी एकाच जीवन वास्तवात जगत असले तरी या जगातील सजीव-निर्जीव वस्तूंकडे दोघेही कोणत्या दृष्टिकोनातून पाहतात यावर त्या वस्तूंना खरे तर अस्तित्व आणि अर्थपूर्णता लाभते. या सजीव-निर्जीव जगात जगणारी माणसे आपल्या ज्ञानेंद्रियाद्वारे ज्या संवेदना अनुभवतात त्यातून त्यांचे एक अनुभवविश्व आकारत जाते व त्या त्या वस्तू व्यक्तींना ते काहीएक अर्थ देते.

सर्वसामान्य माणसे आणि कवीमनाची माणसे यांच्या या अर्थ देण्याच्या प्रक्रियेत, प्रतिसादात मूलभूत फरक असतो. जसे ‘आकाशातील चंद्र’ हा सर्वसामान्य माणसाला चंद्र म्हणूनच दिसतो किंवा काही वेळा तर तो त्याकडे बघतही नाही, पण नारायण सुर्वेंसारखा महाकवी मात्र ‘भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बरबाद झाली’ अशा मार्मिक ओळी लिहितो. सामान्य माणसांपेक्षा  कवी अधिक संवेदनशील असल्यामुळे त्याच्या मनावर उमटणारा वास्तवाचा ठसा अत्यंत तीव्र असा असतो. त्यामुळे त्याला जाणवणारी जगण्यातील भावरूपे अत्यंत उत्कट व व्यामिश्र अशी असतात. ही भावरूपे सर्वसामान्य माणसालाही काहीवेळा जाणवत असतात, पण नेमक्या शब्दांत या भावाशयाची अभिव्यक्ती सर्वांनाच साधता नाही. अशा भावाशयाला आकारित करण्याचे सामर्थ्य, प्रतिभाशक्ती ज्याच्याकडे असते तोच ‘कवी’ म्हटला जातो.

कवीच्या संवेदनशील वृत्तीमुळे कवीमनात सतत श्रेयस आणि प्रेयसाचा संघर्ष सुरू असतो. जगण्यातील अपूर्णता, विरुपता कवीमनाला कायमच अस्वस्थ करीत असते. त्यामुळे त्याचे मन काय ‘असायला हवे’ याचाही अथक शोध घेत असते. जगताना आपल्याला येणारे अनुभव हे वैविध्यपूर्ण असतात. ते कधी संवेदनेच्या स्तरावर, तर कधी कल्पनेच्या स्तरावर, तर कधी वैचारिक स्तरावर, तर कधी या सर्वांच्या संमिश्रणातून येणारे. कवितेमध्ये संवेदना आणि संकल्पनांच्या मधल्या स्तरावर वावरणाऱ्या स्थल-काल विमुक्त कल्पना असतात, त्या आविष्कारात अंतस्फूर्ती असते. याप्रकारे कवी मौलिक अनुभवांची वैशिष्टय़पूर्ण रूपे काव्यातून उत्स्फूर्तपणे आविष्कृत करीत असतो.

pminakshi31@gmail.com

(लेखिका साहित्य संस्कृती मंडळाच्या सचिव, कवयित्री, चित्रकार आहेत.)

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.