अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर आंब्याचा राजा हापूस बाजारात दाखल, एक डझनचा दर किती? 
स्वप्नील घाग April 19, 2026 07:13 PM

Alphonso Mango News :  आज अक्षय तृतीया आहे. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक अत्यंत शुभ मुहूर्त आहे, जो वैशाख शुद्ध तृतीयेला येतो. या अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर आंब्याचा राजा हापूस बाजारात दाखल झाला आहे. सध्या हापूसच्या दराच वाढ झाली आहे.  
वाढलेल्या दरामुळं सर्वसामान्यांच्या ताटातून हापूसची गोडी गायब झाली आहे.

रत्नागिरी स्थानिक बाजारात हापूसची आवक वाढली

रत्नागिरी स्थानिक बाजारात हापूसची आवक वाढली आहे. तरीही एक डझनसाठी तब्बल 800 ते 1200 रुपये मोजावे लागत आहेत. परंपरेनुसार आजच्या दिवशी आंबा खाण्याची प्रथा आहे. पण वाढत्या किमतींमुळे ही गोड परंपरा अनेकांसाठी फक्त पाहण्यापुरतीच राहिली आहे. यंदा हापूसचा सुगंध बाजारात दरवळत आहे, पण चव मात्र खिशाला परवडत नसल्याचे दिसत आहे. 

आजच्या दिवशी सोन्यासोबतच, आंबा खरेदीदेखील मोठ्या प्रमाणात होते

अक्षय तृतीया हा शुभ दिवस मानला जातो. कोणत्याही मोठ्या कार्याची सुरुवात करण्यासाठी या दिवसाला विशेष महत्व आहे. आजच्या दिवशी सोन्यासोबतच, आंबा खरेदीदेखील होते. त्यामुळे फळ बाजारात आंब्याची आवक वाढते. त्यानुसार गेल्या चार दिवसांपासून राज्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये कोकणातून हापूस आंब्याच्या दररोज आवक वाढत असल्याचं चित्र पाहायलामिळत आहे. गेल्या वर्षीपैक्षा यावर्षी आंब्यांची आवक कमी असल्याचं बोललं जात आहे. कारण या वर्षी हवामान बदलाचा आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळं उत्पादनात काही प्रमाणात घट झाली आहे. परिणामी हापूस आंब्याच्या दरात मोठी वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे. ‘गेल्या वर्षीच्या मानाने यावर्षी आवक कमी असली तरी बाजारात या हंगामातील आंब्याची सर्वाधिक आवक अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येला झाली आहे. कोकणाबरोबरच राज्यातील अन्य भागांतून आणि केरळ, कर्नाटकमधूनही वेगवेगळ्या जातींच्या आंब्याची आवक बाजारात झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

पुण्यातील बुधवार पेठ परिसरातील स्वामी मठ येथे आकर्षक आंब्यांची सुंदर आरास

आज अक्षय तृतीया निमित्ताने साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या शुभ दिवशी पुण्यातील बुधवार पेठ परिसरातील स्वामी मठ येथे आकर्षक आंब्यांची सुंदर आरास करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, स्वामींच्या मूर्तीला आज भगवान परशुरामांच्या वेशात सजवण्यात आले असून, त्याचे दर्शन घेण्यासाठी भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. पहाटेपासूनच मोठ्या संख्येने भक्त मंदिरात दाखल होत असून, श्रद्धा आणि भक्तीभावाने दर्शन घेत आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.