भूषण ओक, शेअर बाजार विश्लेषक
कंट्रोल प्रिंट लि. ही कोडिंग आणि मार्किंग सोल्यूशन्स क्षेत्रातील एक अग्रगण्य भारतीय कंपनी असून, ती फूड, फार्मा आणि रसायन यांसारख्या उद्योगांसाठी प्रिंटर आणि त्यासाठी लागणाऱ्या वस्तूंचे उत्पादन करते. कंपनीची स्थापना १९९१ मध्ये झाली असून, मुंबईत तिचे मुख्यालय आहे. नालगढ, हिमाचल प्रदेश आणि आसाममधील गुवाहाटी येथे तिचे उत्पादन प्रकल्प आहेत. तिचे प्रिंटर औद्योगिक उत्पादनांवर लेबल लावण्यासाठी वापरले जातात. यांच्याद्वारे उत्पादन प्रक्रियेच्या दरम्यान पॅकेजिंग, उत्पादनांच्या पृष्ठभागांवर थेट बॅच क्रमांक, मुदत समाप्तीची तारीख, बारकोड, क्यूआर कोड, लोगो, मार्किंग केले जाते. यात कंटिन्यूअस इंकजेट, थर्मल इंकजेट, हाय-रिझोल्यूशन आणि लेझर मॉडेल्स उपलब्ध आहेत, जे बाटल्या, पुठ्ठ्यांचे खोके, शिपर बॉक्सेस, प्लॅस्टिक्स, धातू, लॅमिनेट्स, केबल्स आणि कापड यांसारख्या विविध औद्योगिक वस्तूंवर मार्किंग करण्यास सक्षम आहेत. या लेबलांमुळे एफएमसीजी, फूड, फार्मा, रसायने आणि पेये यांसारख्या क्षेत्रांमध्ये शोधक्षमता (ट्रेसेबिलिटी), नियमपालन आणि बनावट उत्पादनांच्या प्रतिबंधास मदत होते. कंपनी अचूकता, शोधक्षमता आणि कार्यक्षमतेवर लक्ष केंद्रित करून अनेक नव्या तंत्रज्ञानांचा वापर करत आहे.
कंपनीचा महसूल प्रामुख्याने प्रिंटर (११%), कंझ्युमेबल्स म्हणजे शाई, रिबन, क्लिनिंग द्राव्य (६२%), सुटे भाग (१२%) आणि सेवा (१४%) अशा चार विभागांतून येतो. कंपनीचे २०,००० हून अधिक प्रिंटर अनेक उद्योगांमध्ये लागलेले असल्याने यातून कंपनीला स्थिर रोखप्रवाह मिळतो. पॅकेजिंग या नव्या व्यवसायात अजून स्थिरता नाही. कंपनीच्या अपेक्षेनुसार भारतातील; तसेच इटली आणि ब्रिटनमधील उपकंपन्यांचा या क्षेत्रातील व्यवसाय या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत फायदेशीर होईल आणि कंपनीच्या मार्जिन त्यानंतर आणखी सुधारतील.
आर्थिक आकडेवारी
१०७६ कोटींच्या बाजारमूल्याच्या या कंपनीची विक्री आणि निव्वळ नफा गेल्या तीन वर्षांमध्ये अनुक्रमे १८ टक्के आणि ३९ टक्के चक्रवाढ दराने वाढले आहेत. आरओसीई आणि आरओई १८.५ आणि २६.९ म्हणजे उत्तम आहेत. कंपनीने २०२५ मध्ये ४२५ कोटी रुपयांची विक्री केली आणि १०० कोटी रुपयांचा निव्वळ नफा दाखवला. कार्यचालन मार्जिन्स गेल्या पाच वर्षांमध्ये २४ टक्क्यांपर्यंत स्थिर होत्या; पण पॅकेजिंग व्यवसायात स्थिरता न आल्याने २०२५ मध्ये त्या १९ टक्क्यांपर्यंत घसरल्या आहेत. कंपनीची रोख आवक चांगली आहे; पण खेळत्या भांडवलाची गरज जास्त आहे. कंपनीचा ताळेबंद ५४८ कोटी रुपयांचा असून, त्यात ८३ कोटी रुपये रोकड आणि गुंतवणुकीत आहेत. कंपनी कर्जमुक्त आहे.
मूल्यांकन
कंपनीचा शेअर सध्या ११.१ या पीई गुणोत्तराला उपलब्ध आहे. पाच वर्षांचा सरासरी पीई १८.७ आहे. पीईजी ०.२९ आणि ईव्हीईबीटा गुणोत्तर ११.९ आहेत. पिट्रोस्की गुणोत्तर सात म्हणजे उत्तम आहे.
निष्कर्ष
नफावाढीचा विचार करता कंपनीचा शेअर आकर्षक मूल्यांकनात उपलब्ध आहे. गुंतवणूकदारांनी या कंपनीचा जरूर अभ्यास करावा.
(डिस्क्लेमर ः हा लेख केवळ शैक्षणिक उद्दिष्टांसाठी असून, गुंतवणूकदारांनी प्रत्यक्ष गुंतवणुकीसाठी त्यांच्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे अपेक्षित आहे.)