Pune Ring Road : रिहे येथील शेतकऱ्याचा संसार रिंग रोड अधिकाऱ्यांकडून उघड्यावर
esakal April 22, 2026 01:45 AM

पिरंगुट - रिहे (ता. मुळशी) येथील रिंगरोड बाधित शेतकरी विलास शिंदे यांचे राहते घर, जनावरांचा गोठा तसेच अन्य इमारती रिंग रोड अधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाच्या मदतीने बळाचा वापर करून जमीनदोस्त केले. त्यामुळे शिंदे यांचा संसार उघड्यावर आला आहे. शिंदे यांचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्यांना रस्त्याच्या मिळणारा मोबदला अद्याप मिळालेना नाही. मात्र रिंग रोडच्या अधिकाऱ्यांनी शिंदे यांचा गाई म्हशीचा गोठा तसेच राहते घर जमीनदोस्त केले. तीव्र उन्हाळा असूनही रखरखत्या उन्हात गायी म्हशी व लहान वासरे तसेच लहान मुलांसह कुटुंब उघड्यावर आले आहे. शिंदे यांनी दोन दिवसांची मुदत मागूनही ही निर्दयी कारवाई केल्याने शेतकऱ्याने संताप व्यक्त केला आहे.

या कारवाईच्या निषेधार्थ आज (मंगळवारी ता. २१ ) रोजी घोटावडे येथील शेळकेवाडी परिसरातील व्यापाऱ्यांनी बंद पुकारला होता. उद्या बुधवारी (ता. २२) रोजी घोटावडे फाटा येथील चौकात तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने सकाळी दहा वाजता आंदोलन केले जाणार आहे.

याबाबत बाधित शेतकरी विलास शिंदे म्हणाले, रिंगरोडचे अधिकारी विशाल भोईटे यांना वारंवार विनंती करूनही त्यांनी निर्दयीपणे माझ्या घरावर व गोठ्यांवर कारवाई केल्याने त्यांना निलंबित करण्यात यावे. त्यांच्यावर शासनाने कडक कारवाई करावी. माझा सर्वे नंबर ५७८ चा ४ हा सातबारा असलेली जमीन रिंग रोड साठी बाधित झाली असून गेल्या ऐंशी वर्षापासून ती कसत आहे. सातबारावर मी मालक असून या जागेत माझे आरसीसी घर, गोठा, दोन खोल्या, कुक्कुटपालन शेड होते. या गोठ्यात पंधरा गाई असायच्या.

काही लोकांनी हरकत घेतल्याने या जमिनीचा वाद न्यायालयात गेला आहे. आतापर्यंत झालेले सर्व निकाल माझ्या बाजूने झाले आहेत. मात्र सदर प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यामुळे मला त्याचा मोबदला मिळाला नाही. त्यामुळे मी जागा व घराचा ताबा सोडला नाही. पैसे न मिळाल्यामुळे मी माझी जनावरे व कुटुंब घेऊन जाणार कुठे या विवंचनेत असताना आठ दिवसांपूर्वी प्रांत साहेबांनी सुनावणी लावली व मला घराचा व गोट्याचा मोबदला देऊ व नंतर ताबा घेतला जाईल याचे आश्वासन दिले होते. मात्र असे असूनही बळाचा वापर करून रिंग रोड अधिकाऱ्यांनी मला उघड्यावर आणले आहे.

याबाबत रिंगरोडचे काम पाहणारे कार्यकारी अभियंता विशाल भोईटे म्हणाले, शेतकरी विलास शिंदे यांच्याच भावकीतील लोकांनी हरकत घेतल्याने त्या जमिनीसाठी मिळणारा सुमारे साडे दहा कोटी रुपयांचा मोबदला न्यायालयात भरणा केला आहे. दरम्यान , बुधवारी ता.८) रोजी त्यांना पोलिस अधीक्षक कार्यालयात चर्चेसाठी बोलावले होते. शुक्रवार (ता. १७) ते रविवार (ता. १९) या दिवसांची त्यांना मुदत देऊनही त्यांनी ऐकले नाही त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

याबाबत उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले म्हणाले, पुणे चक्राकार महामार्गासाठी मौजे रिहे, ता. मुळशी येथील जमीन गट क्र. ५७८/४ मधील भूसंपादनाची प्रक्रिया पूर्णपणे कायदेशीर नियमांचे पालन करून राबवली जात आहे. या प्रकल्पासाठी एकूण १ हे. ६९ आर क्षेत्रापैकी १ हे. ४४.१६ आर क्षेत्र संपादित करण्यात येत असून, प्रशासनाने २६ जून २०२३ रोजी कलम १९ (ब) अन्वये नोटीस दिली होती आणि त्यानंतर ६ ऑक्टोबर २०२३ रोजी सक्तीचा निवाडा जाहीर केला आहे.

प्रशासकीय पारदर्शकता जपण्यासाठी आणि मोबदल्याचे संरक्षण करण्यासाठी, प्रशासनाने ४ ऑक्टोबर २०२४ रोजी संपादित मिळकतीचा १० कोटी ४३ लाख ३६ हजार ८७७ रुपयांचा मोबदला जिल्हा न्यायालयात वर्ग करण्याचे आदेश दिले होते. यानुसार, ४ जुलै २०२५ रोजी हा मोबदला रीतसर जिल्हा न्यायालयात जमा करण्यात आला आहे. प्रशासन कायद्याच्या चौकटीत राहून आणि सार्वजनिक हितासाठी ही कार्यवाही करत आहे."

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.