Sunrisers Hyderabad vs Delhi Capitals Marathi News: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत ३१ वा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (SRH vs DC) संघात राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झाला.
या सामन्यात अभिषेक शर्माने (Abhishek Sharma) मैदान गाजवत शतकी खेळी केली आहे. त्याने यासोबतच मोठा पराक्रमही केला आहे. त्याच्या शतकामुळे हैदराबादने धावांचा डोंगर उभा करताना दिल्लीसमोर २४३ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे हैदराबादकडून ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा हे दोघे फलंदाजीला उतरले. दोघांनीही सुरुवातीपासूनच आक्रमक फटकेबाजी केली. त्यामुळे ५ षटकातच ५० धावांचा टप्पा पार झाला होता.
त्यानंतर अभिषेकने आणखी आक्रमक खेळण्यास सुरुवात केली, त्याला हेडकडून चांगली साथ मिळाली. अभिषेकने २५ चेंडूतच अर्धशतक पूर्ण केले. मात्र ९ व्या षटकात ट्रॅव्हिस हेडला अक्षर पटेलने बाद केले. त्याचा झेल समीर रिझवीने घेतला. हेडने २६ चेंडूत ३७ धावा केल्या.
पण, त्यानंतरही अभिषेकने त्याची लय कायम ठेवली. त्याला कर्णधार इशान किशनची साथ मिळाली. त्या दोघांनी १३ षटकातच संघाला दीडशे धावांचा टप्पा पार करून दिला. यादरम्यान १४ व्या षटकात नितीश राणाकडून अभिषेकचा झेल सुटला. त्याचा फायदा घेत १५ व्या षटकात अभिषेकने नितीश राणाच्याच गोलंदाजीवर सलग दोन षटकार मारून ४७ चेंडूत त्याचे दुसरे आयपीएल शतक पूर्ण केले. त्याच्या या शतकामुळे त्याने आता विराट कोहलीची बरोबरी केली आहे.
अभिषेकने केली विराटची बरोबरीटी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके (Most T20 Centuries) करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत अभिषेक आता विराट कोहलीसह अव्वल क्रमांकावर आला आहे. अभिषेकचे हे टी२० क्रिकेटमधील १८४ डावातील ९ वे शतक आहे.
विराटनेही ९ टी२० शतके केली आहेत. त्याने ४०३ डाव आत्तापर्यंत खेळले आहेत. या यादीत अभिषेकने रोहित शर्माला मागे टाकले. रोहितने ४५४ डाव खेळताना ८ शतके केली आहेत.
दरम्यान टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करण्याचा विश्वविक्रम सध्या ख्रिस गेलच्या नावावर असून त्याने २२ शतके केली आहेत. त्यापाठोपाठ १२ शतकांसह बाबर आझम आहे. त्यानंतर डेव्हिड वॉर्नर (१० शतके) आहे. अभिषेक आणि विराटसह साहिबजादा फरहान, रिली रुसौ, क्विंटन डी कॉक यांचेही टी२०मध्ये ९ शतके आहेत.
हैदराबादचा धावांचा डोंगरदरम्यान, अभिषेकच्या शतकानंतर मात्र १५ व्या षटकातच इशान किशन मात्र धावबाद झाला. इशानने १३ चेंडूत २५ धावा केल्या. त्यामुळे हेनरिक क्लासेन फलंदाजीला आला. त्यानेही फटकेबाजी केली. त्याने या सामन्यादरम्यान आयपीएलमध्ये १०० षटकात पूर्ण केले.
त्याने ५२ डावात १०० षटकार पूर्ण केल्याने तो आयपीएलमध्ये १०० षटकात सर्वात कमी डावात पूर्ण करणारा तिसरा फलंदाज ठरला. त्याच्यापुढे केवळ ख्रिस गेल (३७ डाव) आणि आंद्रे रसेल (४७ डाव) आहेत.
दरम्यान इशान आणि क्लासेन यांनी हैदराबादला २० षटकात २ बाद २४२ धावांपर्यंत पोहचवले. अभिषेक शर्मा ६८ चेंडूत १० चौकार आणि १० षटकरांसह १३५ धावांवर नाबाद राहिला. क्लासेन १३ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारांसह ३७ धावांवर नाबाद राहिला.