मध्य रेल्वेचे अत्यंत वर्दळीचे स्थानक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ( सीएसएमटी ) स्थानकावर दोन लोकल एकाच मार्गावर समोरा समोर आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेच्या वेळी दोन लोकल मधील अंतर अवघे १२० मीटर इतक होते असे म्हटले जात आहे.जर या दोन लोकलची टक्कर झाली असती तर भयंकर दुर्घटना घडली असती. या प्रकाराची चौकशी करण्यासाठी आता समिती नेमण्यात आली आहे. सायंकाळच्या वेळी पिक अवर सुरु होताना ही घटना घडल्याने लोकल प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागला आहे.
कालच मध्य रेल्वेच्या डोंबिवली स्थानकाजवळ सकाळी कळवा कारशेडमधून कल्याणच्या दिशेने जाणारी एक रिकामी लोकल रुळावरून घसरल्याचा प्रकार घडला होता.त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक दिवसभर विस्कळीत झाली होती.त्यातच कालचा गोंधळ कमी होता की काय ते आज सायंकाळी चुकीचा सिग्नल दिल्याने दोन लोकल समोरसमोर आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. मात्र, मोटरमनने प्रसंगावधान दाखवत लोकलचे वेळीच ब्रेक दाबल्याने पुढील अनर्थ टळल्याचे म्हटले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,सीएसएमटी स्थानकावर मंगळवारी दुपारच्या सुमारास दोन लोकल एकाच मार्गावर आल्या. या दोन लोकलच्या मध्ये एक सिग्नल होता. लोकल फलाटासाठी असलेला सीएसएमटी इंटरनल होम सिग्नल लाल झाला होता. त्यामुळे मोटरमनने लोकल थांबवली. यावेळी दोन्ही लोकलमध्ये केवळ १३० मीटर इतके अंतर होते. त्यामुळे मोठा अपघात टळल्याचे म्हटले जात आहे. या घटनेनंतर ऐन सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत लोकल सेवा विस्कळीत झाल्याने कामावरुन घरी जाणाऱ्या प्रवाशाना नाहक मनस्ताप भोगावा लागला.अनेक लोकल उशिराने धावत असल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. या घटनेमुळे स्थानकावर उपस्थित प्रवाशांनी भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
चुक कोणाची ? चौकशी होणारमध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, दुपारी ३.१८ वाजता बदलापूर येथून आलेल्या एक लोकलला फलाट क्रमांक ४ च्या ऐवजी फलाट क्रमांक ५ चा सिग्नल देण्यात आला. मात्र, त्याच वेळी फलाट क्रमांक ५ वर अन्य एक ( खोपोली ) लोकल उभी होती. या दोन्ही लोकल समोरासमोर आल्यामुळे फलाट क्रमांक ५, ६, ७ आणि ८ चे मार्ग देखील बंद झाले होते. अखेर बदलापूरहून आलेली लोकल मागे घेण्यात आली. त्यानंतर खोपोली लोकल पुढे गेली. त्यानंतर सीएसएमटीवरील लोकल सेवा पुन्हा सुरळीत करण्यात आली. रेल्वे प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने चौकशी सुरू केली असून, नेमकी चूक कुठे झाली याचा शोध घेण्यात येत आहे. तसेच, या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.