भारतात एखाद्याला डिलिव्हरी बॉयची नोकरी लागली असं म्हटलं की कष्ट आणि कमी पगाराचंच चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. त्या डिलिव्हरी बॉयला ऊन, वारा, पाऊस झेलत दिवसभर धावपळ केल्यानंतर कुठे महिन्याला २५-३० हजार पदरात पडतात.
त्यामुळेच आपल्याकडे या कामाकडे फारशा आकर्षणाने पाहिलं जात नाही. पण तुम्हाला विश्वास बसणार नाही, जगाच्या पाठीवर असाही एक देश आहे जिथे डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणं हे केवळ काम नसून लखपती होण्याचा मार्ग आहे.
तिथे ही नोकरी पार्ट टाईम (Part-time) करण्याचा कल जास्त आहे. दिवसातून फक्त ४ तास काम करूनही लोक इतके पैसे कमावतात की ते भारतातल्या एखाद्या मोठ्या ऑफिसरच्या पगारापेक्षाही जास्त असतात.
अमेरिकेत डिलिव्हरी करणाऱ्यांची चांदी होण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे तिथलं टिप कल्चर. आपल्याकडे टिप देणं ऐच्छिक असतं, पण अमेरिकेत ती एक परंपरा आहे. अनेकदा डिलिव्हरी शुल्कापेक्षा ग्राहकांनी दिलेली टिपच जास्त असते.
न्यूयॉर्क किंवा सॅन फ्रान्सिस्कोसारख्या शहरात एका डिलिव्हरीवर १० ते ३० डॉलर्स म्हणजे अंदाजे ८०० ते २५०० रुपये फक्त टिप मिळते. त्यातच हे लोक एकाच वेळी ‘Uber Eats’ आणि ‘DoorDash’ सारखी अनेक ॲप्स वापरून स्मार्टली काम करतात.
जर तुम्ही अमेरिकेत दिवसाचे ८ तास पूर्णवेळ काम केलं, तर तासाला सरासरी २० ते ३० डॉलर्सची कमाई होते. या हिशोबाने दिवसाला साधारण २०,००० रुपये आणि महिन्याला तब्बल ५ ते ६ लाख रुपये सहज कमावता येतात.
विशेषतः विकेंडला किंवा रात्रीच्या वेळी (Dinner time) काम केल्यास कंपन्यांकडून भरघोस बोनसही मिळतो. थोडक्यात सांगायचं तर, न्यूयॉर्क-लॉस एंजेलिससारख्या शहरात डिलिव्हरी देणारा माणूस आलिशान आयुष्य जगू शकतो!