अमेरिका आणि इराणमध्ये पुन्हा एकदा युद्धविराम वाढवण्याची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून करण्यात आली आहे. मात्र जरी युद्धविराम वाढला असला तरी देखील स्ट्रेट ऑफ होर्मूजमध्ये अजूनही तणाव कायम आहे. युद्धविराम वाढवण्याची घोषणा करण्यापूर्वी अमेरिकेनं इराणशी संबंधित दोन जहाजं ताब्यात घेतले होते, त्यामुळे इराणने चांगलीच आक्रमक भूमिका घेतली, आम्ही याचं उत्तर देऊ अशी धमकी इराणकडून अमेरिकेला देण्यात आली होती. त्यानंतर आता मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे इराणच्या आयआरजीसीने तीन जहाजं स्ट्रेट ऑफ होर्मूजमधून ताब्यात घेतली आहेत. हा मार्ग इराने व्यापारी जहाजांसाठी बंद केला आहे, तर दुसरीकडे अमेरिकेनं देखील या मार्गावर नाकेबंदी केली आहे. त्यामुळे संपूर्ण जगावर मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. याच दरम्यान इराणने स्ट्रेट ऑफ होर्मूजमधून जाणारे तीन जहाजं ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर येत आहे.
द वीकच्या एका रिपोर्टनुसार इराणच्या आयआरजीसी ने स्ट्रेट ऑफ होर्मूजमधून तीन जहाजं ताब्यात घेतली आहेत, ज्यापैकी एक जहाज भारतामध्ये येणार होतं. Epaminondas नावाचं हे जहाज भारताकडे निघालेलं असतानाच इराणने ताब्यात घेतलं आहे. भारताकडे येणारं हे जहाज एका ग्रीक कंपनीच्या मालकीचं आहे. हे जहाज दुबईच्या जेबेल अली बंदरावरून भारताकडे येण्यासाठी रवाना झालं होतं. मात्र इराणने हे जहाज आपल्या ताब्यात घेतलं आहे. या तीनही जहाजांनी नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप इराणकडून करण्यात आला आहे, हा भारतासाठी आणखी एक धक्का मानला जात आहे.
दरम्यान दोनच दिवसांपूर्वी इराणकडून भारताचा झेंडा असलेल्या दोन जहाजांवर फायरिंग करण्यात आली होती. दुबईवरून निघालेल्या या जहाजांना पुन्हा एकदा युटर्न घ्यावा लागला होता. हे जहाज कच्चं तेल घेऊन भारताकडे निघाले होते. मात्र स्ट्रेट ऑफ होर्मूज सामुद्रधुनीमध्ये इराणकडून या जहाजांवर फायरिंग करण्यात आली. इराणकडून भारतीय जहाजांवर अचानक फायरिंग झाल्यामुळे वातावरण चांगलचं तापलं होतं. भारत सरकारने या घटनेवर चिंता व्यक्त केली होती. स्ट्रेट ऑफ होर्मूजमध्ये परिस्थिती अशीच कायम राहिल्यास जगभरात मोठं ऊर्जा संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.