अहिल्यानगर : राज्यातील दोन मतदारसंघात पोटनिवडणूक होत असून बारामती आणि राहुरी (Rahuri Election) मतदारसंघातील निवडणुकांसाठी उद्या म्हणजेच 23 एप्रिल रोजी मतदान होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर बारामती आणि राहुरी दोन्ही मतदारसंघात महायुतीची जाहीर सभा संपन्न झाली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दोन्ही उमेदवारांसाठी मतदानाचं आवाहन केलं. विशेष म्हणजे राहुरी मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून माजी मंत्री प्राजक्त तनपुरेंना (Prajakt tanpure) उमेदवारी देण्यात येणार होती. मात्र, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी भेट घेतल्यानंतर तसेच मुख्यमंत्र्यांनी फोनवरुन बोलणे केल्यानंतर त्यांनी उमेदवारी नाकारल्याने त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कारण, शरद पवारांच्या राष्ट्रवादीने येथून गोविंद मोकाटे यांना उमेदवारी दिली आहे. आता, ऐन मतदानाच्या आदल्यादिवशी तनपुरे यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करत आपली भूमिका निश्चित केली आहे.
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीबाबत घेतलेल्या निर्णयाची सविस्तर माहिती देत, पुढील वाटचालीसाठी कार्यकर्ते व नागरिकांशी संवाद साधूनच दिशा निश्चित करण्यात आली आहे. संयम, एकता आणि सत्य माहितीवर विश्वास ठेवूया, अफवांपासून दूर राहा असे म्हणत प्राजक्त तनपुरे यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने निवेदनही जाहीर केलं आहे. त्यामुळे, तनपुरे यांची भूमिका काय असा प्रश्न अद्यापही कायम असल्याचे दिसून येते. कारण, आपल्या निवेदनात त्यांनी कोणत्या उमदेवाराच्या पाठीशी आपण आहोत, हे जाहीर केले नाही.
प्राजक्त तनपुरे यांनी आपल्या फेसबुकवर एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. ज्यात “राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीतून मी माघार घेण्याचा निर्णय का घेतला, याची माहिती आपणा सर्वांना आहेच. हा निर्णय परिस्थितीचा सखोल विचार करून आणि सर्व घटकांचा आदर राखून घेतलेला आहे. तसेच, पुढील वाटचालीबाबत निर्णय घेण्यापूर्वी गावागावातील प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्याशी सविस्तर चर्चा करण्याचे मी ठरवले होते. त्या अनुषंगाने मी सर्व संबंधितांशी संवाद साधला असून, त्यांच्या मतांचा आदर ठेवून पुढील दिशा निश्चित केली आहे. मला माहित आहे की, अनेकजण पुढील भूमिकेबाबत विचारणा करत आहेत. अशावेळी आपण सर्वांनी संयम बाळगून, स्थानिक प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करावी आणि त्यांच्या निर्णयाचा सन्मान करावा, कोणत्याही अफवा किंवा चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका”. असे आवाहन प्राजक्त तनपुरे यांनी आपल्या पोस्टमधून केले आहे. दरम्यान, यंदाच्या निवडणुकीत तनपुरे यांची भूमिका भाजपला पूरक अशीच राहिली आहे.
दरम्यान, त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली याबाबत त्यांनी माध्यमांना सांगणं टाळलं आहे. त्यामुळे, या पोटनिवडणुकीत प्राजक्त तनपुरे यांची भूमिका ही शेवटपर्यंत संभ्रमात राहिली आहे. त्यांनी उघडपणे कोणाला पाठींबा दिला नाही, मात्र कार्यकर्त्यांना सूचक संदेश दिला तो देखील ऐनवेळी दिला असल्याने त्यांचे कार्यकर्ते हे प्रचारात दिसले नाहीत. आता, गुरुवारी मतदान करताना त्यांचे कार्यकर्ते कुणाला मतदान करणार किंवा कोणाला पाठींबा देणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
आणखी वाचा