शिवराज गोर्ले
वर्तमानकाळ हाच तर आपल्यासमोर असतो, तोच फक्त उपलब्ध असतो. त्यामुळे नेहमी वर्तमानातच जगावं लागतं. पण तेही वाटतं तितकं सोपं नसतं. ‘जगावेगळं अध्यात्म’मध्ये विमलाजी ठकार तर म्हणतात, ‘वर्तमानात जगणं मोठं तप आहे. भूतकाळाच्या स्मृतींनी वर्तमानातलं जगणं प्रदूषित होऊ नये आणि उधार कल्पना घेतलेलं जे भविष्य- त्याची छाया पण वर्तमानावर पडू देऊ नये. समोर आलेलं जीवन समग्रतेने न्याहाळावं, त्याला असा प्रतिसाद द्यावा की त्याच क्षणाला ते जगून संपलं पाहिजे. प्रत्यक्षात मात्र भूतकाळाला पुन्हा पुन्हा जगवून आपण आपल्याच ‘वर्तमाना’चा नाश करत असतो.
काही लोकांचे स्वभावच त्यांच्या जगण्याआड येत असतात. त्यांचं सतत रडगाणं सुरू असतं. ‘असं घडलं नाही अन् तसं घडलं नाही. हे करायचं होतं आणि ते करायचं होतं.’ जे घडलं नाही त्यासाठी रडत बसायचं आणि आता वर्तमानात जे घडविण्याची वेळ आली आहे, तिकडे दुर्लक्ष करायचं किंवा मग आता पुढे काय करायचं, याची नुसती स्वप्न पाहत बसायचं!’
म्हणून विमलाजी बजावतात, वर्तमानात जगा! कल करै सो आज कर, आज करै सो अब! जे काही करायचं आहे ते आत्ता, इथे, या क्षणी! इथे एक प्रश्न निश्चितच उपस्थित होतो. वर्तमानात जगावं, हे तर मान्यच आहे, पण म्हणजे भविष्याचं काही ‘प्लॅनिंग’ करायचं की नाही! अध्यात्मात असं ‘प्लॅनिंग’ वर्ज्य आहे की काय? त्यासंदर्भात विमलाजी हे स्पष्ट करतात की, ‘संपूर्ण जीवनासाठी ‘प्लॅनिंग’ करताना तुम्ही उद्याचाच का, पुढच्या पन्नास वर्षांचा विचार करून ठेवा, पण ज्यावेळी मानवी संबंधांमध्ये प्रत्यक्ष जगण्याचा प्रसंग येतो, तेव्हा तुम्ही प्रत्येक घटकेला, प्रत्येक क्षणाला जितक्या मनमोकळंपणानं, दिलखुलासपणे एकमेकांना भेटता येईल तितक्या मोकळेपणानं भेटायला हवं, कारण उद्याचा दिवस, तुम्हाला किंवा त्यांना उजाडेल की नाही, याचा भरवसा नसतो. कोणता श्वास शेवटचा ठरेल याची काही शाश्वती नसते. म्हणूनच जो श्वास आता मिळाला आहे, त्याचा उत्कटतेनं संपूर्ण उपभोग घ्यावा. त्या क्षणात आपली सगळी शक्ती ओतून, आपली सहृदयता, सावधानता ओतून जगावं म्हणजे हाच जरी शेवटचा श्वास ठरला तरी आपलं काही जगायचं राहिलं असं वाटू नये. असं जेव्हा आपण सर्वस्व ओतून पाहतो, ऐकतो, बोलतो, चालतो, सोबत देतो, संगत करतो तेव्हा त्या कर्मामध्ये इतका आनंद असतो की त्या कर्माचं फळ काय मिळणार आहे, याची चिंताच राहत नाही. ‘दि ॲक्ट ऑफ लिव्हिंग बिकम्स इट्स ओन फुलफिलमेंट!’
याच संदर्भात विमलाजींनी मांडलेला एक मुद्दा नक्कीच महत्त्वाचा आहे. त्या म्हणतात, ‘मानवी संबंधांना भावी आयुष्यासाठी ‘गुंतवणूक’ बनवू नये! आजचे जे संबंध आहेत ते उद्या उपयोगी पडतील, म्हातारपणी कामी येतील अशा भावनेनं आपण जगायला गेलो, तर ते सारे अंदाज खोटे ठरू शकतात. त्या ‘भावी सुखा’च्या कल्पनेमध्ये आपणच दुःखाची बीजं पेरली, असं होऊ शकतं.’
अर्थात सुखदुःख तर होतंच, पण त्यावर ‘अध्यात्म’ असं सुचवतं की सुख असो, दुःख असो त्या त्या क्षणाला इतक्या समग्रतेनं, सहृदयतेनं ते भोगावं की पुढच्या क्षणाला काही उरूच नये! प्रत्यक्षात मात्र क्षणिक दुःखाला ‘कंटिन्युइटी’ देऊन आपणच ‘व्यथा’ निर्माण करत असतो. खरं तर पुढचा प्रत्येक क्षण नवा असतो. जीवनाच्या ‘अमरते’चं ते नवं रूप असतं. आता जसं झालं, तसंच पुढे होईल हे कशावरून? म्हणूनच जे झालं त्याच्या स्मृती घोळवत बसू नये. मात्र जीवन नित्यनूतन असतं, तसंच अनिश्चितही असतं. कुठल्याही क्षणी थेट मृत्यूही येऊ शकतो. म्हणूनच प्रत्येक क्षण लाखमोलाचा. तो समग्रतेनं, उत्कटतेनं जगून घ्यावा. तात्पर्य पुन्हा तेच- हर पल यहाँ जी भर जियो! बस्स, एवढंच.
हे सारं नक्कीच पटणारं आहे. पण खरंच असं आपण जगू शकतो का? ‘होय’, जे. कृष्णमृर्ती म्हणतात, ‘तुम्हाला फक्त एकच दिवस, एकच तास जगायचे आहे असे तुम्हाला समजले तर तुम्ही काय कराल? सर्व कुटुंबियांना, मित्रांना एकत्र बोलवाल. तुमच्याकडून झालेल्या चुकांची क्षमा मागाल, त्यांनाही क्षमा कराल. मनातल्या सर्व अभिलाषाही संपुष्टात येतील. विचार करा- एका तासासाठी जर हे करता येते तर उरलेल्या दिवसासाठी- सर्व आयुष्यासाठी असेच का करता येऊ नये? मनावरची अशी सगळी दडपणं उतरली की पुढचा प्रवास सहज, सोपा होऊन जातो. शेवटी ‘मुक्काम’ महत्त्वाचा नसतो. प्रवासातला आनंद महत्त्वाचा. म्हणूनच ‘आत्ता, इथे, या क्षणी’ अशी कृती करा. अशी कृती करता करता त्याचीच वृत्ती होते, जगण्याची पद्धती होते, तुमच्या ‘असण्या’चीच पद्धती होते!