Aishwarya Narkar on Scam: मराठी मनोरंजन विश्वातील अभिनेत्री ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) कायम आपल्या वेगवेगळ्या साड्यांच्या लुकमुळे चर्चेत असतात. काही महिन्यांपूर्वी ऐश्वर्या नारकर अभिनेत्री तितिक्षा तावडे आणि सुरुची अराडकर यांनी साड्यांचा व्यवसाय सुरू केला होता. त्यांच्या या व्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. पण आजकालच्या जगात सगळे व्यवहार ऑनलाइन होत असताना अनेकदा फसवणुकीचे प्रकार समोर येताना दिसतात. असाच एक प्रकार अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांच्यासोबत घडलाय . त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत याविषयी माहिती दिली आहे. त्यांच्या साडीच्या ब्रँडच्या नावाचा वापर करून दुसरच कोणीतरी पैसे घेत असल्याचा प्रकार त्यांनी चाहत्यांना सांगितला. (Scam Alert)
ऐश्वर्या नारकर या सोशल मीडियावर बऱ्यापैकी ऍक्टिव्ह असतात. अनेक रील आणि फोटोशूटमधून चहा त्यांना त्यांच्या आयुष्याबद्दलची माहिती त्या देतात. अलीकडेच सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी त्यांच्यासोबत घडलेल्या एका स्कॅमबद्दल सांगितलं. त्या म्हणाल्या ' मी खूप घाईत हा व्हिडिओ करतेय. कारण आता जवळपास तिसरी चौथी वेळ आहे, आमच्या सोबत हे घडतंय. 'थ्रेड अँड ठुमका ' या आमच्या साडीच्या ब्रँडच्या नावाचा वापर करत कोणीतरी पैसे घेत आहे आणि ग्राहकांना साड्या देऊ असं खोटं आश्वासन देत आहे. त्यामुळे कृपया जर तुम्ही 'थ्रेड अँड ठुमका'ला पैसे पाठवत असाल, तेव्हा ते आमचं बिजनेस अकाउंट आहे की नाही हे तपासून घ्या. कारण आमच्या अकाउंटचं नावही तेच आहे. " असं ऐश्वर्या नारकर यांनी सांगितलं.
View this post on Instagram
त्यापुढे म्हणाल्या," आमच्या सोशल मीडिया अकाउंटच्या बायोमध्ये आमचा व्हाट्सअप नंबर दिलेला आहे. आम्हाला डीएम करू नका. जर तुम्हाला कमेंटमध्ये कोणी रिप्लाय देत असेल तर ते नंबर आमचे नाहीत. कमेंट मध्ये जर रिप्लाय करत आहेत ते नंबर फ्रॉड आहेत.आम्ही अनेकांना ब्लॉक केलंय. हे पेमेंट आमच्यापर्यंत येतच नाही. कारण हा मोठा स्कॅम आहे. त्यामुळे आम्ही साड्या डिलिव्हर करू शकत नाही. जेव्हा तुम्ही पेमेंट करता त्यावेळी बरोबर नंबर वापरलाय का हे चेक करा. हा स्कॅम सध्या बेसिक लेवलला सुरू असला तरी पुढे जाऊन हे वाढू शकतं. त्यामुळे पेमेंट करताना 'थ्रेड अँड ठुमका ' च्या बिझनेस अकाउंटला पेमेंट करा. जर आमच्या ब्रँडचं नाव नसेल तर पेमेंट करू नका.आम्हाला थेट मेसेज करा.अशा पद्धतीच्या स्कॅम पासून वाचा. आपल्या आजूबाजूला अशा चीप मेंटॅलिटीचे लोक असतात. हे मढ्याच्या टाळूवरचं लोणी खातात. त्यामुळे तुम्ही त्याला फसू नका. जागरूक रहा. ' असं ऐश्वर्या नारकर यांनी सांगितलं.