नाले सफाईचा मार्ग सुकर
esakal April 23, 2026 09:46 PM

नालेसफाईचा मार्ग सुकर
आवश्यक परवानगीचे वनमंत्र्यांचे आदेश
भाईंदर, ता. २३ (बातमीदार) : मिरा-भाईंदर शरातील अनेक नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कांदळवनांची झाडे आहेत. या नाल्यांची सफाईसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांनुसार तातडीने परवानगी देण्याचे आदेश वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले आहेत. त्यामुळे नालेसफाईला गती येणार आहे.
शहरात दीडशेहून अधिक छोटे-मोठे नाले आहेत. दरवर्षी पावसाळा सुरू होण्याआधी सफाई केली जाते. अनेक नाल्यांमध्ये तिवरांची झाडे असल्याने पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण होतो. शिवाय नालेदेखील व्यवस्थित साफ करता येत नाहीत. नाल्यातील गाळ काढणे, पावसाळी पाण्याचा सुरळीत निचरा करणे, नाल्यामधील तिवरांची मृत झाडे काढणे आवश्यक असते, परंतु यासाठी कांदळवन विभागाची परवानगी बंधनकारक असते. या पार्श्वभूमीवर वनमंत्री गणेश नाईक यांना संयुक्त बैठक आयोजित करण्याची विनंती महापौर डिंपल मेहता यांनी केली होती. तसेच तिवारांच्या झाडांमुळे नालेसफाई करणे कठीण होत असून, शहरात पूरसदृश परिस्थिती निर्माण होत असल्याचे सांगितले.
--------------------------------------
मिरा-भाईंदर क्षेत्रातील १९ ठिकाणी सर्वेक्षण सुरू आहे, तर उर्वरित ठिकाणांचे सर्वेक्षण २४ एप्रिलपर्यंत पर्यंत पूर्ण करून आवश्यक परवानगी देण्यात येईल, असे कांदळवन विभागाने स्पष्ट केले आहे. तसेच पालिकेला पावसाळ्यापूर्वीची नालेसफाईची कामे पूर्ण करता यावी, यासाठी सर्वेक्षण तातडीने पूर्ण करून सर्वोच्च न्यायालयाच्या अटी-शर्तींनुसार परवानगी देण्यात येणार आहे.
------------------------------
शहराच्या एका बाजूला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, दुसऱ्या बाजूला समुद्र असल्यामुळे भरतीच्या वेळी अतिवृष्टी झाल्यास पाणी साचण्याची गंभीर समस्या निर्माण होते. त्यामुळे नालेसफाईसाठी वन विभागाची परवानगी तातडीने देण्याची विनंती केली आहे.
- राधाबिनोद शर्मा, आयुक्त

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.