IPL 2024 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सला (KKR) जेतेपद मिळवून देणाऱ्या श्रेयस अय्यरला संघातून मुक्त करणे ही एक महागात पडलेली चूक असल्याचे मत माजी प्रशिक्षक चंद्राकांत पंडित यांनी व्यक्त केले आहे. पंडित म्हणाले की, श्रेयस हा एक उत्कृष्ट खेळाडू आणि कर्णधार आहे, ज्याने संघाला ट्रॉफी जिंकून दिली. मात्र, काही धोरणात्मक निर्णयामुळे आणि परिस्थितीमुळे त्याला सोडावे लागले, ज्याचा वैयक्तिकरित्या मला खूप वाईट वाटले.
चंद्रकांत पंडित यांनी RevSportz शी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, पंजाब किंग्जमध्ये (PBKS) गेल्यानंतर श्रेयसच्या कामगिरीत कमालीची प्रगती दिसून आली आहे. 2025 च्या लिलावात 26.75 कोटी रुपयांची विक्रमी बोली लागल्यानंतर, त्याने पंजाबला अंतिम फेरीपर्यंत नेले आणि आयपीएल 2026 च्या हंगामातही संघाने सुरुवातीचे सहा सामने जिंकून अपराजित राहण्याचा पराक्रम केला आहे. पंडितांच्या मते, श्रेयस आता अधिक परिपक्व झाला असून त्याची फलंदाजी करण्याची शैली आणि निर्भय वृत्ती पंजाबच्या यशात मोलाची ठरत आहे.
हिंदुस्थानच्या टी-20 संघातील श्रेयसच्या स्थानावर भाष्य करताना पंडित म्हणाले की, हिंदुस्थानी क्रिकेटमधील वाढती स्पर्धा आणि नवीन खेळाडूंना संधी देण्याच्या धोरणामुळे काही वेळा वरिष्ठ खेळाडूंना बाहेर बसावे लागते. तरीही, चालू आयपीएल हंगामात 5 डावात 182.45 च्या स्ट्राईक रेटने 208 धावा करत श्रेयसने आपली क्षमता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. केवळ परिस्थितीचा विचार न करता मॅच जिंकवण्याकडे त्याचा असलेला कल त्याला इतरांपेक्षा वेगळे ठरवतो, असं पंडित म्हणाले आहेत.





