Buldhana News: तळपत्या तापमानाने शेती कामांना लागला ब्रेक!; नांगरणी-मशागत कामे ठप्प; शेतकरी चिंतेत
esakal April 25, 2026 01:45 PM

हिवरा आश्रम: मेहकर तालुक्यात यंदाचा उन्हाळा केवळ ऋतू न राहता शेतीसाठी गंभीर संकट ठरत आहे. एप्रिलच्या अखेरीसच तापमान ३८-४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने पेरणीपूर्व शेती कामावर मोठा परिणाम झाला आहे. नांगरणी, कुळवणी, बांध दुरुस्ती, खत व्यवस्थापन यांसारखी मूलभूत कामे रखडल्याने संपूर्ण हंगाम धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कडक उन्हामुळे दुपारच्या सत्रातील काम पूर्णपणे ठप्प झाले असून शेतकऱ्यांना सकाळ संध्याकाळच्या मर्यादित वेळेतच काम उरकावे लागत आहे. मात्र हा वेळ अपुरा ठरत असल्याने कामांचा वेग मंदावला आहे. यासोबतच मजुरांची कमतरता ही मोठी अडचण ठरत आहे.

वाढत्या तापमानामुळे मजूर कामासाठी पुढे येत नसल्याने शेतकऱ्यांचे नियोजन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, पाण्याची तीव्र टंचाई आणि विजेचा अनियमित पुरवठा यामुळे सिंचन व्यवस्थेवर गंभीर परिणाम झाला आहे. परिणामी, शेतीची उत्पादकता कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

उन्हाळ्यातील योग्य नियोजन हे खरीप हंगामाच्या यशाचे मुख्य आधार मानले जाते; मात्र यंदा प्रतिकूल हवामानामुळे ही प्रक्रिया अडखळली आहे. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर अशा तीव्र उन्हाळ्यांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे सूक्ष्म सिंचन, जलसंधारण आणि कामाच्या वेळांचे पुनर्नियोजन यांसारख्या शाश्वत उपाययोजना राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच प्रशासनाने पाणी व वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

"तळपत्या उन्हामुळे शेतीकाम करणे अत्यंत कठीण झाले आहे. दुपारच्या वेळी शेतात काम करणे अशक्यप्राय झाले असून उन्हाच्या तीव्र दाहकतेमुळे नांगरणीसह इतर कामे वेळेत पूर्ण होत नाहीत. अशीच परिस्थिती कायम राहिली, तर पेरणी उशिरा होऊन संपूर्ण हंगामावर त्याचा गंभीर परिणाम होईल."

- विकास सास्ते, शेतकरी, हिवरा आश्रम

शेतकऱ्यांसमोर संकटांची मालिका

कडक उन्हामुळे दुपारचे काम पूर्णपणे ठप्प, मजुरांची उपलब्धता घटल्याने कामांचा वेग मंदावला, पाण्याच्या तीव्र टंचाई मुळे शेती नियोजन विस्कळीत, विजेच्या लपंडावामुळे सिंचन व्यवस्थेवर परिणाम, नांगरणी-मशागत वेळेत न झाल्याने पेरणीपूर्व तयारी धोक्यात.

उन्हामुळे शेतीकाम पूर्णपणे ठप्प

दुपारच्या कडक उन्हामुळे शेतीकाम पूर्णपणे ठप्प झाले असून नांगरणी, कुळवणी आणि बांध दुरुस्तीची कामे रखडली आहेत; परिणामी पेरणीपूर्व तयारीत मोठा विलंब होत आहे. सकाळ संध्याकाळच्या मर्यादित वेळेतच काम उरकण्याचा ताण वाढला असून एकूणच शेतीच्या उत्पादनक्षमतेवर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.