Mansoon Will arrived Soon: या एप्रिल महिन्यात सूर्यनारायणाचे रौद्ररूप उभ्या भारताने पाहिले आहे. तापमान 40-44 डिग्रीपर्यंत पोहचले आहेत. उत्तर, मध्य आणि पूर्वोत्तर भारत उष्णतेच्या लाटेत होरपळला आहे. तर अल निनोमुळे यंदा मान्सून लांबण्याचा आणि पाऊस उशीरा येण्याचा दावा करण्यात येत होता. परिणामी शेतकऱ्यांसह सरकारही चिंतेत आले होते. पण नवीन संकेतानुसार मान्सूनने सांगावा धाडला आहे. पाऊस नेहमीपेक्षा लवकर धडकेल. युरोपीयन मध्यम श्रेणी हवामान अंदाज केंद्राने (ECMWF) नवीन अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार, मान्सून अगोदर अंदमान निकोबार बेटावर धडकेल. येत्या 18 ते 25 मे या कालावधीत पावसाचे आगमन होईल. दरवर्षी भारतात मान्सून याच ठिकाणाहून भारतात प्रवेश करतो.
दक्षिण राज्यात मान्सूनचे आगमन
मे च्या मध्यात अथवा अखेरीस अंदमान निकोबार बेटासह दक्षिण भारतात पाऊस हजेरी लावेल. या पट्ट्यात 30 ते 60 मिमीहून अधिक पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 25 मे ते 1 जून यादरम्यान केरळ आणि तामिळनाडूच्या दक्षिण टप्प्यात पावसाचे आगमन होईल. यामुळे शेतीच्या कामांना वेग येण्याची शक्यता आहे. तर गर्मी, उष्णतेने हवालदिल झालेल्या नागरिकांसह पशूपक्ष्यांना आणि प्राण्यांना मोठा दिलासा मिळेल.
आतापासूनच संकेत कसे?
हवामान तज्ज्ञानुसार, सध्याचे सर्व हवामानाचे संकेत हे बंगालच्या खाडीत आणि अंदमानच्या समुद्रावरून दक्षिण-पश्चिम दिशेने वेगवान वारे दर्शवत आहेत. हेच वारे समुद्रावरून आर्द्रता घेऊन येते. या थंडगार वाऱ्यामुळे पावसाची शक्यता बळावते. याशिवाय अंदमानच्या उत्तर पट्ट्यात एक चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मान्सून अवघ्या 20 दिवसात भारताच्या दक्षिण किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे.
अल निनोची भीती नाही
हवामान तज्ज्ञ देवेंद्र त्रिपाठी यांनी किसानतकला दिलेल्या माहितीनुसार, यंदा मान्सूनचे आगमन अधिक लवकर होईल. तर अल निनोची (El Nino) कोणतीही भीती नसेल. मान्सूनसाठी सध्या सकारात्मक वातावरण आहे. तर इंडियन ओशन डायपोलची (IOD) भूमिकाही महत्त्वाची मानली जात आहे. यामध्ये हिंद महासागराच्या पूर्व आणि पश्चिम भागातील समुद्राचे तापमान ठरते. या तापमानात अंतर असते. मान्सूनसाठी IOD अनुकूल मानल्या जात आहे. सध्या उष्णतेने जमीन रापली आहे. कडक उन्हामुळे पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाल्याचे मानले जात आहे. अजून 15 दिवस कडक उन्हामुळे मान्सूनसाठी चांगले वातावरण असेल असा दावा करण्यात येत आहे.