>> सोहम पिंगळीकर, [email protected]
थिएटरमध्ये शिट्टय़ा, टाळ्या, संवादांना प्रतिसाद देणाऱया भारतीय प्रेक्षक संस्कृतीत एखादा सिनेमा ‘कल्ट’ आहे की नाही, हे स्पष्टपणे ठरवणं अवघड होतं. त्यासाठी मुख्य संस्कृतीच्या चौकटीत तयार होणारी, ‘सबकल्चर’ ही संकल्पना जाणून घ्यायला हवी.
माझ्या आईबाबांच्या लग्नाच्या पत्रिकेवर म्हणे स्पष्ट छापलं होतं – लग्नानंतर टीव्हीवर ‘महाभारत’ दाखवण्यात येईल. त्या काळी बी. आर. चोप्राच्या महाभारतची अशी क्रेझ होती की, हे नोंदवलं नसतं तर कदाचित लोक लग्नालाच आले नसते…आणि खरंच, लग्न लागल्यावर आधी सगळ्यांनी एकत्र बसून ‘महाभारत’ पाहिली. या एका किश्शातून एक गोष्ट स्पष्ट दिसते ः भारतीय प्रेक्षक दृश्य माध्यमांबद्दल कधीच तटस्थ किंवा उदासीन नव्हता. ‘रामायण’ चालू असताना लोक हात जोडून टीव्हीपुढे बसायचे. सिनेमा बघणे मनोरंजन नव्हे, तर एक अनुभव असतो. पहिल्या लेखात आपण पाहिलं की, ‘कल्ट सिनेमा’ हा एखादा ठरावीक सिने प्रकार नसून प्रेक्षक त्या सिनेमाशी काय करतात, तो कसा पाहतात, त्यात कसा सहभाग घेतात, यावरून तो ‘कल्ट’ ठरतो. पण भारतीय संदर्भात ‘कल्ट’ची सीमारेषा नेमकी कुठे आखायची?
भारतीय प्रेक्षकाची संकल्पना मुळातच सामूहिक आणि देहाधारित आहे. थिएटरमध्ये शिट्टय़ा, टाळ्या, संवादांना प्रतिसाद देणं; शेजारीपाजारी एकत्र बसून सिनेमा पाहणं आणि त्यावर चर्चा करणं या गोष्टी इथे सामान्य आणि रोजच्या आहेत. याउलट पाश्चात्त्य प्रेक्षक प्रामुख्याने शांत, तटस्थ आणि अखंड कथानकाला प्राधान्य देणारा असतो. तिथे प्रेक्षकांनी मोठय़ाने प्रतिसाद दिला, संवाद म्हटले तर तो अपवाद ठरतो आणि अशा अपवादांमधूनच काही सिनेमे पुढे ‘कल्ट’ म्हणून ओळखले जातात.
भारतात हे समीकरण मोडून पडतं. भारतीय प्रेक्षक हा नाटक आणि लोकपरंपरेला सरावलेला आहे. ‘वन्स मोअर’ देणं त्याच्या रक्तात भिनलेलं आहे. त्यामुळे सिनेमा पाहतानाही ही वृत्ती लपत नाही. सिनेमातली गाणी, संवाद, हावभाव सहजपणे दैनंदिन आयुष्याचा भाग बनतात. कथानक थांबवून पेरलेली गाणी, समोसे-चहासाठी दिलेला इंटर्व्हल या गोष्टी फक्त भारतात आढळतात, पण त्या ‘व्यत्यय’ ठरत नाहीत. उलट या रचनेमुळे सिनेमा पाहणं ही एक अखंड, शांत प्रक्रिया न राहता एक इव्हेंट बनते, जिथे प्रेक्षक हा केवळ निरीक्षक नसून सक्रिय सहभागी असतो. तो विनोदांवर खळखळून हसतो, हिरोईनवर भाळतो आणि व्हिलनच्या नावाने बोटंही मोडतो. त्यामुळे भारतीय सिनेमात सक्रिय सहभाग हा अपवाद नसून तेच त्याचे मूलभूत लक्षण आहे.
याचे उदाहरण घ्यायचे झाले तर – राजश्री प्रॉडक्शनच्या सिनेमांमुळे अवाढव्य, खर्चिक लग्नांचं आकर्षण वाढलं. ‘हम आपके है कौन’सारख्या सिनेमामुळे ‘जूते चुराई’सारखी प्रथा तर लग्नसोहळ्याचा अविभाज्य भागच बनली. या चित्रपटातील संवाद लोकप्रिय झाले, संपूर्ण दृश्यांच्या नकला केल्या जातात, त्यातील विधी पुन्हा सादर केले जातात, गाणी वारंवार वाजवली जातात, कल्ट फॉलोविंगची अनेक लक्षणं इथे दिसतात. मग हा सिनेमा ‘कल्ट’ ठरतो का? हा प्रश्न समजून घेण्यासाठी आधी ‘सबकल्चर’ ही संकल्पना स्पष्ट करणं गरजेचं आहे.
सबकल्चर म्हणजे मुख्य संस्कृतीच्या चौकटीत तयार होणारी, पण स्वतची वेगळी मूल्यं, आवडी-निवडी आणि आचार पद्धती जपणारी गट संस्कृती. ती विशिष्ट गटांच्या अनुभवांवर आणि ओळखीवर आधारलेली असल्यामुळे तिचा स्वर मुख्य प्रवाहापेक्षा वेगळा जाणवतो. तरीही मुख्य संस्कृतीशी नातं ठेवत ती स्वतची शैली, प्रतीकं आणि अर्थनिर्मिती घडवत राहते. आता प्रश्न असा उभा राहतो की, भारतात जवळ जवळ प्रत्येक सिनेमा काही ना काही प्रमाणात ‘साजरा’ केला जात असेल तर त्याला सबकल्चर कसं म्हणायचं? आपण आधी पाहिलं की, ‘कल्ट’ म्हणजे फक्त लोकप्रियता नाही; केवळ सहभाग, टाळ्या, संवादांची पुनरावृत्ती यामुळे सिनेमा ‘कल्ट’ ठरत नाही. अनेकदा हा सहभाग तत्कालिक असतो. सिनेमा संपला की, तोही ओसरतो. तर काही वेळा तो इतका सर्वव्यापी होतो की, त्याचं ‘वेगळेपण’च नष्ट होतं. सिनेमा ‘कल्ट’ होण्यासाठी मुख्य प्रवाहाच्या काठावर किंवा बाहेर राहून स्वतचं स्वतंत्र अस्तित्व टिकवावं लागतं आणि तेव्हाच उपसंस्कृती निर्माण होण्याची शक्यता तयार होते.
‘हम आपके…’च्या बाबतीत सहभाग नक्कीच दिसतो, पण तो ‘कल्ट’मध्ये रूपांतरित होत नाही. कारण हा सिनेमा वेगळी उपसंस्कृती निर्माण करत नाही. उलट प्रस्थापित संस्कृतीलाच अधिक भव्य, आकर्षक रूप देतो. त्याने काही प्रथा लोकप्रिय केल्या, जनमानसात रुजवल्या, पण त्या इतक्या व्यापक झाल्या की, त्या ‘वेगळ्या’ राहिल्याच नाहीत. त्या मुख्य प्रवाहाचाच भाग बनल्या. त्यामुळे असे सिनेमे ‘कल्ट’ म्हणून नव्हे, तर Cultural standardization म्हणजे सांस्कृतिक मानकीकरण याचे उदाहरण म्हणून योग्य ठरतात.
मग पुढचा प्रश्न ः जर बहुतांश सिनेमांबाबतीत हा सबकल्चरचा निकष लागू होत असेल तर भारतात ‘कल्ट’ आहे का? तर नक्कीच आहे, पण इथली प्रेक्षक संस्कृती सिनेमांशी इतकी घट्ट जोडलेली आहे की, एखादा सिनेमा ‘कल्ट’ आहे की नाही, हे स्पष्टपणे ठरवणं अवघड होतं. आता ‘हेराफेरी’चं उदाहरण घ्या. ‘ये बाबूराव का स्टाइल है’, ‘पचास रुपये काट ओव्हर अॅक्टिंग का’ असे संवाद सिनेमापुरते उरत नाहीत. ते सतत नव्या प्रसंगांत, नव्या संदर्भांत वापरले जात राहतात. चित्रपट पूर्णपणे मुख्य प्रवाहात विरघळून जात नाही. तो आपलं स्वतंत्र अस्तित्व जपत सतत जिवंत राहतो. तेव्हाच तो ‘कल्ट’ होण्याची शक्यता तयार होते.
या सगळ्या पार्श्वभूमीवर एक गोष्ट स्पष्ट होते ः भारतीय प्रेक्षकरचना स्वततच ‘कल्ट’ घडवण्यासाठी पोषक आहे. त्याची नेमकी कारणं आपण पुढील लेखात पाहू.
(लेखक चित्रपट समीक्षक, अभ्यासक आहेत)