नंदिनी वैद्य, ‘सेबी’ नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार
पुणे येथील आदिसॉफ्ट टेक्नॉलॉजीज लि.चा एसएमई आयपीओ सोमवार, २७ एप्रिलपर्यंत विक्रीसाठी उपलब्ध आहे. हा ७४ कोटी रुपयांचा आयपीओ असून, त्यासाठीचा किंमतपट्टा १६३-१७२ रुपये आहे. एसएमई आयपीओ असल्यामुळे छोट्या गुंतवणूकदारांना कमीत कमी १६०० शेअरसाठी (रु. २,७५,२००) अर्ज करावा लागणार आहे. कंपनीचा व्यवसाय प्रामुख्याने वाहन क्षेत्राशी निगडित आहे. ती डिजिटल ऑटोमेशन सोल्यूशन्स देण्याचे काम करते. ऑटोमेटेड असेंब्ली लाइन्स, मटेरिअल हँडलिंग मशीन्स, रोबोटिक वर्क सेल्स आणि विशेष मशीनरीशी संबंधित डिझाइनिंग, डेव्हलपमेंट, असेंब्लिंग, टेस्टिंग अशा प्रकारच्या अभियांत्रिकी सेवा कंपनी देते. आयपीओमधून मिळणाऱ्या निधीचा वापर कर्ज परतफेड, व्यवसायविस्तार आणि खेळत्या भांडवलाशी निगडित गरजांसाठी केला जाणार आहे.
गुंतवणुकीतील जोखीम
व्यावसायिक आणि आर्थिक आघाडीवर कंपनीची कामगिरी उत्तम आहे, तरी धंदा-व्यवसायात काही जोखमी निश्चितच संभवतात. आयपीओसाठी अर्ज करणाऱ्या गुंतवणूकदारांनी या बाबी बारकाईने बघाव्यात. कंपनीच्या उत्पन्नाचा ७५ टक्क्यांच्या आसपास हिस्सा पहिल्या १० ग्राहकांकडून येतो, त्यातही ४९ टक्के इतका भाग एकाच ग्राहकाकडून येतो. त्यामुळे ‘क्लायंट कॉन्सट्रेशन’चा धोका संभवतो. ग्राहकांकडून असलेली येणी अधिक आहेत; तसेच आर्थिक वर्ष २०२६ मध्ये पहिल्या सात महिन्यांतील विक्री आणि नफ्याचे प्रमाण घटल्याचे दिसत आहे.
मूल्यांकन
मागील तीन आर्थिक वर्षांसाठी, कंपनीने सरासरी रु.१०.८१ प्रतिशेअर उत्पन्न (ईपीएस) आणि निव्वळ मालमत्तेवरील परतावा (RoNW) ३२.९२ टक्के दिला आहे. ३१ ऑक्टोबर, २०२५ रोजी प्रतिशेअर निव्वळ मालमत्ता मूल्य (NAV) ४४.१६ रु. होते. या आधारावर, इश्यूची किंमत साधारण ३.९० पट येते. आपण आर्थिक वर्ष २०२६ च्या सात महिन्यांच्या आकडेवारीचा वार्षिक दृष्टीने विचार केला आणि आयपीओनंतरच्या पूर्णपणे डायल्यूटेड पेड-अप इक्विटी कॅपिटलचा संदर्भ गृहीत धरला, तर पी/ई ४३.७७ च्या आसपास येते, तर आर्थिक वर्ष २०२५ च्या कमाईच्या आधारावर पी/ई १७.६० येतो. हा विचार करता हा आयपीओ स्वस्त नाही. ग्रे मार्केटमध्ये चालू प्रीमियम १० रुपये (५.८१ टक्के) अधिक दिसत आहे.
आर्थिक बाजू
आर्थिकदृष्ट्या कंपनी सक्षम आहे. मागील दोन वर्षात ‘आरओई’ (शेअरवरील परतावा) उत्तम म्हणजे ४० टक्क्यांच्या आसपास आहे. डेट/इक्विटी रेशो वाजवी आहे.
तौलनिक अभ्यास :
कंपनीच्या कामाशी तुलना होऊ शकेल अशी पाटील ऑटोमेशन ही बाजारात नोंदणी झालेली कंपनी आहे. नोंदणी झाल्यापासून ३६ टक्के परतावा मिळाला आहे. दोन्हींची तुलना केली असता ‘आदिसॉफ्ट’ बहुतांश निकषांवर सरस आहे.