नवी मुंबई : परिवहन विभागाने रिक्षा चालकांना मराठी भाषा येणं बंधनकारक केलं असून या निर्णयाचं मनसेनं स्वागत करत नवी मुंबईत आगळी-वेगळी मोहीम राबवली. सिवूड परिसरात रिक्षांवर 'मी मराठी बोलतो, मला मराठी समजते, या माझ्या रिक्षात बसा' असे स्टिकर्स लावण्यात आले आहेत. मराठीवर प्रेम करणाऱ्या रिक्षा चालकांनी महाराष्ट्रद्रोहींना विरोध करावा, असं आवाहनही करण्यात आलं आहे. तसंच मोटार वाहन कायद्यानुसार मराठी बोलणं बंधनकारक असल्याचं सांगत, पुढे रिक्षा परवाना देताना करडी नजर ठेवण्याचा इशाराही मनसेकडून देण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने रिक्षा चालकांना मराठी भाषा येणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) या भूमिकेचे जोरदार स्वागत केले आहे. नवी मुंबईत मनसेतर्फे रिक्षा चालकांमध्ये जनजागृती करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेअंतर्गत 'मी मराठी बोलतो, मला मराठी समजते, या माझ्या रिक्षात बसा' अशा आशयाचे स्टिकर रिक्षांवर लावण्यात आले. काही राजकीय पक्षांकडून या निर्णयाला विरोध होत असताना मनसेने स्पष्ट भूमिका घेत मराठी भाषेच्या समर्थनार्थ उभे राहत रिक्षा चालकांना संपाला विरोध करण्याचे आवाहन केले.
मनसे प्रवक्ते आणि नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाबाहेर अनेक रिक्षांवर हे स्टिकर लावण्यात आले. या वेळी मोठ्या संख्येने रिक्षा चालक आणि मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.
गजानन काळे यांनी सांगितले की, मोटार वाहन कायदा 1988 नुसार प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (RTO) परवाना देताना रिक्षा चालकाला स्थानिक भाषा येते की नाही हे तपासणे आवश्यक आहे. त्यामुळे मराठी भाषा येणे ही अनिवार्य अट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यापुढे मराठी भाषा न येणाऱ्या चालकांना परवाना देण्यात येतो का, यावर मनसेची करडी नजर असेल, असा इशारा देण्यात आला. तसेच मराठी भाषेच्या विरोधात जाणाऱ्या कोणत्याही हालचालींना विरोध केला जाईल, असेही मनसेकडून स्पष्ट करण्यात आलं.
मनसेच्या या मोहिमेला रिक्षा चालकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, अनेक चालकांनी मराठी बोलणे आवश्यक असल्याचे मान्य केले. विशेष म्हणजे काही अमराठी रिक्षा चालकांनीही मराठी शिकण्याची तयारी दर्शवली.
ही बातमी वाचा: