Pune News : १०० दिवसात नागरी हितापेक्षा भ्रष्टाचाराला प्राधान्य; सत्ताधारी भाजपवर काँग्रेसची टीका
esakal April 29, 2026 02:45 AM

पुणे - भाजप सत्तेत येऊन १०० दिवस होत असताना नागरिकांच्या प्रश्नाला बगल देऊन केवळ भ्रष्टाचाराला प्राधान्य दिले जाते आहे. महापालिकेतील कारभार दिशाहीन असून, पारदर्शकता केवळ बोलण्यापुरती मर्यादित आहे. सत्ताधाऱ्यांच्या या कारभाराला प्रशासनाची साथ मिळत आहे, अशी टीका काँग्रेसने पत्रकार परिषदेत केली.

शहराध्यक्ष अरविंद शिंदे आणि गटनेते ॲड. रामचंद्र उर्फ चंदूशेठ कदम यांनी पत्रकार परिषदेत त्यांची भूमिका मांडली.

शिंदे म्हणाले, ‘भाजपने निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने अद्याप कागदावरच आहेत. ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना करसवलत आणि महिलांच्या नावावरील मालमत्तांना दिलासा देण्याचे आश्वासन पूर्ण न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय नाही, त्यांच्यात केवळ वाद होत आहेत. त्यामुळे अनेक महत्त्वाची कामे रखडली आहेत.

रामचंद्र कदम म्हणाले, ‘वाहतूक कोंडी आणि अनियमित पाणीपुरवठा, पीएमपीमधील भरती, पदोन्नती प्रक्रियेतील गडबड, चुकीच्या होर्डिंग परवानग्या, कचरा व्यवस्थापन प्रकल्पांमध्ये अनियमितता आहे. त्यावर भाजपला अंकुश ठेवता आला नाही, उलट कचरा प्रकल्पांचे चुकीचे प्रस्ताव समोर आणत आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.