पुणे - वृक्षतोडीमुळे उन्हाळा तीव्र होत असल्याबाबत सर्वत्र चिंता व्यक्त केली जात असताना पुण्यात महापौर बंगल्यातील सुमारे २० झाडे महापालिकेने तोडली आहेत. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात बंगल्याच्या आवारातील हिरवळ गायब झाल्याने हा बंगला भकास दिसत आहे. धक्कादायक म्हणजे ही झाडे का कापली याची माहिती विचारल्यानंतर अधिकाऱ्यांकडे याचा तपशील माहिती नसल्याचेही समोर आले.
पुणे महापालिकेकडून शहरातील हरीतक्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. प्रत्येक वर्षी पावसाळ्यात वृक्ष लागवड केली जाते. नागरिकांना मोफत रोप वाटप केले जाते. शहरातील नागरिक ही झाडांच्या संवर्धनासाठी संवेदनशील असून, विकास प्रकल्प असो की अन्य कोणतेही कारण यावेळी होणाऱ्या वृक्षतोडीला कडाडून विरोध करतात.
गेल्या काही दिवसांपासून शहरातील उन्हाचा पारा ४० अंश सेल्यियसच्या पुढे आहे. या वैशाख वणव्यात उकाड्याने अंगाची लाहीलाही होत असताना शहरातील कमी होणाऱ्या झाडांच्या संख्येबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. त्यातच आता महापौर बंगल्यातील झाडे तोडल्याचा प्रकार समोर आला आहे.
महापौर बंगल्याच्या समोरच्या अंगणातील आणि पाठीमागच्या बाजूची काही झाडे पूर्णपणे तोडण्यात आली आहेत. तर काही झडांच्या मोठ्या फांद्या तोडून २० फुटापर्यंतचा बुंधा शिल्लक ठेवला आहे. यात आंबा, चिंच, कडूलिंब यासह अन्य झाडांचा समावेश आहे. शिवाजीनगर-घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाने ही झाडे तोडली आहेत.
उद्यान अधिक्षक अशोक घोरपडे म्हणाले, ‘वृक्षतोडण्याची परवानग क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाकडून दिली जाते. याची माहिती नाही.’
सहाय्यक आयुक्त बाळासाहेब ढवळे पाटील म्हणाले, ‘महापौर बंगल्यातील झाडे का तोडली आहेत याची सर्व माहिती आत्ताच उपलब्ध नाही. याची सर्व माहिती उद्या उपलब्ध करून दिली जाईल.’
याबाबत महापौर मंजूषा नागपुरे म्हणाल्या, ‘मी बंगल्यात नसताना झाडे तोडली जात होती. ही माहिती मिळाल्यानंतर हे काम त्वरित थांबवून याच्या परवानगीबाबत विचारले होते. मला परवानगी दाखवल्यानंतर दोन दिवसांनी फांद्या छाटण्याचे काम सुरु झाले. झाडांना कीड लागत असल्याने उपचारासाठी फांद्या कापण्यात आल्याचे मला सांगितले आहे.’
झाडे तोडण्याच्या फाईलचा झटपट प्रवास
१) छाटणीच्या नावाखाली प्रस्ताव – १२ मार्च रोजी १९ झाडांच्या फांद्या छाटण्याचा प्रस्ताव सादर
२) दुसऱ्याच दिवशी मंजुरी – १३ मार्चला तातडीने परवानगी; प्रक्रियेचा वेग संशयास्पद
३) अतितत्परता कोणासाठी? – एवढ्या घाईने मंजुरी देण्यामागे नेमका हेतू काय, प्रश्न उपस्थित
४) नियमांचा भंग – वृक्ष प्राधिकरण समितीची अनिवार्य परवानगी घेतली नाही
५) नोटीस व हरकतींची प्रक्रिया डावलली – १५ दिवसांची नोटीस, हरकती व सुनावणी न करता थेट कारवाई