मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 41 वा सामना होणार आहे. मुंबईचा हा आठवा तर हैदराबादचा नववा सामना असणार आहे. मुंबईला आतापर्यंत 7 पैकी फक्त 2 सामनेच जिंकता आले आहेत. तर 5 वेळा पराभूत व्हावं लागलं आहे. मुंबई विरुद्ध हैदराबाद हा सामना पलटणच्या घरच्या मैदानात होणार आहे. वानखेडे स्टेडियममध्ये दोन्ही संघ भिडणार आहेत. मुंबईने घरच्या मैदानात सलग 3 सामने गमावले आहेत. त्यामुळे मुंबईसमोर घरच्या मैदानातील पराभवाची मालिका खंडीत करण्याचं आव्हान असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला हैदराबादचा विजयी घोडदौड कायम राखण्याचा प्रयत्न असणार आहे. हार्दिक पंड्या मुंबईचं नेतृत्व करणार आहे. तर पॅट कमिन्स याच्याकडे हैदराबादच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे.
हैदराबादने आतापर्यंत 8 पैकी 5 सामन्यांत विजय मिळवला आहे. हैदराबादने गेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध 25 एप्रिलला 5 विकेट्सने विजय मिळवला आहे. त्यामुळे हैदराबादचा विश्वास दुणावलेला आहे. तर मुंबईसमोर कमबॅक करण्याचं आव्हान आहे. अशात मुंबईला 2 गुणांसाठी चांगलीच कसरत करावी लागणार आहे.
दोन्ही संघांची पॉइंट्स टेबलमधील स्थितीताज्या आकडेवारीनुसार, मुंबई पॉइंट्स टेबलमध्ये नवव्या स्थानी आहे. मुंबईने 7 पैकी फक्त 2 सामने जिंकले आहेत. मुंबईचा नेट रनरेट हा -0.736 असा आहे. तर हैदराबाद 10 गुणांसह चौथ्या स्थानी आहे. हैदराबादचा नेट रनरेट हा +0.815 इतका आहे.
हैदराबाद गेल्या पराभवाचा वचपा काढणार?हैदराबाद वानखेडे गेल्या पराभवाचा हिशोब करण्यासाठी मुंबई विरुद्ध मैदानात उतरणार आहे. गेल्या मोसमात (IPL 2025) मुंबई विरुद्ध हैदराबाद यांच्यात 2 सामने खेळवण्यात आले होते. तेव्हा मुंबईने दोन्ही सामन्यात ऑरेंज आर्मीला लोळवलं होतं. त्यामुळे आता मुंबई हैदराबाद विरुद्ध सलग तिसरा विजय मिळवणार की हैदराबाद 2 गुणांची कमाई करणार? याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
वानखेडेत धावांचा पाऊस फिक्स!वानखेडे स्टेडियम तुलनेने लहान आहे. त्यामुळे इथे हमखास 200 पेक्षा अधिक धावा होतात. तसेच 200 पेक्षा अधिक धावा चेसही होतात. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना या मैदानात फटकेबाजी पाहायला मिळणार असल्याचं निश्चित आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यात हैदराबादच्या गोटात विस्फोटक फलंदाज आहेत. ट्रेव्हीस हेड आणि अभिषेक शर्मा ही आक्रमक सलामी जोडी काय करु शकते हे क्रिकेट चाहत्यांना चांगलंच माहित आहे. तसेच इशान किशनही जोरात फटकेबाजी करतोय. त्यामुळे पलटणच्या गोलंदाजांसमोर हैदराबादच्या त्रिकुटाला रोखण्याचं आव्हान असणार आहे.