- विनायक द्रविड, करिअर मार्गदर्शक व ट्रेनर
अपयश हे जीवनाचा अविभाज्य घटक आहे. या जगात प्रत्येक माणसाला अपयशाचा सामना करावा लागतो. माणूस कितीही मोठा, कोणत्याही पदावर असला तरी त्याला अपयशाला तोंड द्यावेच लागते. त्या परिस्थितीत तुम्ही कसे वागता, कशी प्रतिक्रिया देता, कसे सावरता, तुमचं मन आणि डोकं शांत ठेवून अपयश कसं स्वीकारता, त्यातून तुमच्या मानसिक कणखरतेची परीक्षा होते. अपयश हे आयुष्यातील चढ-उतारांचा एक भाग आहे.
तुम्हाला एखाद्या क्षेत्रात अपेक्षित यश मिळाले नाही म्हणून तुम्ही आयुष्यात अपयशी ठरत नाही. खरंतर माणसाच्या आयुष्यात शिकण्याची सगळ्यात चांगली वेळ म्हणजे ‘अपयशाचा काळ.’ तो तुम्हाला जीवनातील असे धडे शिकवतो, जे तुम्हाला कोणीच कधीही शिकवू शकत नाही. आपण अपयशाला कसे समोर जातो, त्यापेक्षाही आपण त्यातून किती लवकर सावरतो आणि ‘बाउन्स बॅक’ होतो हे महत्त्वाचे आहे.
अपयशाला न घाबरता सामोरे जाणे, त्यातून शिकणे, अनुभव घेणे, आपल्यात बदल करणे, आपल्या चुका मान्य करून पुढे जाणे ही प्रक्रिया महत्त्वाची आहे. यातून तुम्ही पुढे जाता तेव्हा तुम्ही यशाच्या दिशेने वाटचाल करता. प्रत्येक अपयश नशिबाच्या माथी मारणार असाल तर तुमची प्रगती नक्कीच थांबते. अपयश ही शिकण्याची उत्तम संधी असते. तुम्ही त्याच्याकडे कसे पाहता, तुमची मानसिकता, मनाचा ताबा, सकारात्मक विचार करण्याची प्रवृत्ती यावर ते अवलंबून असते.
सिनेसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन यांनाही करिअरमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात अपयश पचवावे लागले. क्रिकेटसारख्या खेळात तुम्हाला अपयशाचे ग्रहण कधी लागेल हे कोणीच सांगू शकत नाही, म्हणूनच त्याला ‘गेम ऑफ अनसरटन टी’ असे नाव आहे. भारतीय क्रिकेटमध्ये सुनील गावस्करपासून विराट कोहलीपर्यंत कोणीही यातून सुटले नाही. साक्षात सचिन तेंडुलकरच्या क्रिकेट प्रवासाची सुरुवात ही अपयशाने झालेली आहे.
भारतीय क्रिकेटमध्ये अनेकदा अपयश पचवून परत यशस्वी झालेले अनेक खेळाडू आहेत. मोहिंदर अमरनाथ, महेंद्रसिंह धोनी, राहुल द्रविड, वीरेंद्र सेहवाग आदी दिग्गज खेळाडूंना अनेकदा अपयशाचा सामना करावा लागला आहे. प्रत्येक वेळी परिस्थितीतून मार्ग काढून ते यशस्वी झाले आहेत. म्हणूनच त्यांना ‘वर्ल्ड क्लास’ असे संबोधले जाते.