येत्या एक मेपासून १०७ दिवसांत खाड खाड मराठी शिकण्याची सुवर्णसंधी आमच्या रिक्षा-टॅक्सीचालक बांधवांकडे चालून आली आहे. अवघ्या १०७ दिवसांत आजवर कुणीच मराठी भाषा शिकू शकलेले नाही. एक मेपासून १५ ऑगस्टपर्यंत मराठी शिकून घ्यावी, अन्यथा कारवाईस तयार राहावे, असा इशारा परिवहन विभागाने दिला आहे. ही ‘विपदा में संधी’ आहे. उत्तम मराठी शिकणाऱ्या ‘रिक्षार्थीं’ना मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय आणि परिवहन विभागातर्फे रीतसर प्रमाणपत्र बहाल करण्यात येणार आहे. या १०७ दिवसांच्या धडक अभ्यासक्रमात (पक्षी : क्रॅश कोर्स) मराठीचे जुजबी, मध्यम आणि प्रवीण असे टप्पे असणार आहेत. प्रवीण रिक्षावाल्यास स्वत:च्याच रिक्षात मागील बाजूस बसणेचा मान मिळेल!
कुठेही प्रवेश घ्यायचा तर हल्ली सीइटी (केंद्रीय चाचणी परीक्षा) असते. त्याच धोरणानुसार इथेही सीइटी असेल. सीइटी आली, म्हणजे गाईडबुकेही आली. तदनुसार मराठी भाषा अभ्यासक्रमासाठी परिवहन विभागातर्फे गाइडबुक ऊर्फ पुस्तिका काढण्यात येत असून ती रिक्षाचालकांमध्ये वाटण्यात येईल. त्यानुसारच मराठीत बोलावे लागणार आहे.
तथापि, काही लोकांच्या मनात कार्ब्युरेटरमध्ये अडकलेल्या कचऱ्यासारख्या काही शंका अडकल्या आहेत, असे निदर्शनास आले आहे. त्या शंका आणि त्यांचे निरसन (ऊर्फ फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स) येणेप्रमाणे :
१. रिक्षार्थींसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षा (‘मुन्नाभाई पद्धती’ने) डमी वापरून देता येतील का?
२. शेअर रिक्षा, स्टँड, आरटीओ, पाशिंग, बॅज, युनिफॉर्म, पंक्चर, सीएनजी, आईल, मामा, शिग्नल, लायसन, परमीट, मीटर, खुल्ला, गांधी, लिव्हर, भाडा, शीट, ईस्ट, वेस्ट आदी संज्ञा एवं शब्दप्रयोग मराठी भाषेत जसेच्या तसेच वापरता येतील, याची नोंद घ्यावी.
३. रिक्षावाल्यांच्या परीक्षांचे पेपर कोण तपासणार, हे अजून ठरलेले नाही. परंतु, खुद्द परिवहन मंत्रीच गठ्ठे घेऊन बसतील, अशी चिन्हे आहेत.
४. परीक्षा सोपी असेल. उदाहरणादाखल खालील संवाद पहा : अडवानी नावाच्या एखाद्या सिंधी प्रवाशाला बांदऱ्याहून चेंबूरला जायचे आहे.
अडवानी : भाई, चेंबूर जानेका हय, कितना लेगा?
रिक्षावाला : मीटर के हिसाब से जो होगा!
अडवानी : मीटर कोन देखता है वणी? मुहब्बत से बोलो!
रिक्षावाला : (मुहब्बत से) खाली आना पडता हय...चेंबूर नाके पे छोडेगा!
...हे संभाषण मराठीत संभवू शकत नाही. उदाहरणार्थ ः
अडवानी : (अडखळतानी) भाऊ, चेंबूर जावायच्या, किती घेणार? (अत्यंत आक्षेपार्ह हातवारे…)
रिक्षावाला : (रिक्षा ऑलरेडी रिझर्वला आल्याच्या आवाजात) मीटरअनुसार देवा साहेब!
अडवानी : (पुस्तिकेत शोधून न सापडल्यामुळे) मीटर के मां की आंख...
रिक्षावाला : (गरम होऊन) शिव्या काय देतो रे? थांब, (पुस्तिकेत शिव्या शोधतो, पण सापडत नाहीत.) पुढले ‘खाली आना पडता है’ वगैरे संभाषण राहूनच जाते...तेवढ्यात गिऱ्हाईकास मराठी स्टिकर लावलेली ‘खाली’ रिक्षा मिळते, गिऱ्हाईक जाते.) यात चुकले कोणाचे?
५. कामचलाऊ मराठी शिकण्यासाठी १०७ दिवस कशाला लागतात? ‘नही आयेगा’ च्या ऐवजी ‘नाय येणार’ एवढे म्हणण्यासाठी १०७ दिवसांचा कोर्स, पुस्तिका एवढे नाटक हवे कशाला?
६. रिक्षा थांबवण्यासाठी हात दाखवत उभ्या असलेल्या पाशिंजरांकडे दुर्लक्ष करून बेधडक पुढे निघून जायचे असते. फारतर ‘नाही नाही’ अशी मान हलवत रिक्षा जोरात पुढे न्यायची असते. यात भाषेचा संबंध कुठे आला?
७. मौनं सर्वार्थ साधनम! पाशिंजराने गंतव्यस्थान सांगितले की रिक्षाचा दांडा ओढावा. भर्रदिशी रिक्षा काढावी, आणि ‘किती झाले?’ या विचारणेला मीटरकडे बोट दाखवावे. किस्सा खतम!