Mumbai: महापौर बंगल्याच्या नूतनीकरणाला मंजुरी, तब्बल ३ कोटींचा खर्च; पण रखडलेली देखभाल आणि 'गृहप्रवेशा'बाबत प्रश्नचिन्ह
esakal April 30, 2026 02:45 AM

मुंबई : भायखळा येथील राणीच्या बागेतील ऐतिहासिक महापौर बंगल्याच्या नूतनीकरणाच्या ३ कोटी ४८ लाख रुपयांच्या प्रस्तावाला अखेर स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. मात्र, गेल्या चार वर्षांपासून हा बंगला वापराविना बंद राहिल्याने त्याच्या अवस्थेबाबत शिवसेना (उद्धव ठाकरे गट) सदस्य रमाकांत रहाटे यांनी प्रशासनाला धारेवर धरले. देखभालीकडे झालेल्या दुर्लक्षामुळेच एवढा मोठा खर्च करण्याची वेळ आल्याचा आरोप करत त्यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर सवाल उपस्थित केले.

दादर येथील महापौरनिवासस्थान बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी दिल्यानंतर महापौरांचे वास्तव्य राणी बागेतील या बंगल्यात हलवण्यात आले होते. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यानंतर हा बंगला प्रदीर्घ काळ बंद होता. आता या बंगल्याचे नूतनीकरण करण्यासाठी महापालिकेने पावले उचलली आहेत.

Mumbai Pune Expressway: यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ पूर्ण; घाटातील कोंडीपासून सुटका

या प्रकल्पांतर्गत अंतर्गत फर्निचर दुरुस्ती, अत्याधुनिक स्वयंपाकगृह, इटालियन संगमरवरी फरशी, व्हेनेशियन फिनिश आणि पारंपरिक झुंबरे लावून बंगल्याचे सुशोभीकरण केले जाणार आहे. या कामासाठी 'ब्युकॉन इंजिनिअरिंग इन्फ्रास्ट्रक्चर्स' या कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली असून, कामासाठी पाच महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.

स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव चर्चेला आला असता, रमाकांत रहाटे यांनी प्रस्तावाचे स्वागत केले, परंतु बंगल्याच्या दुरवस्थेबद्दल संताप व्यक्त केला. "चार वर्षांपासून हा ऐतिहासिक बंगला बंद आहे. जर पालिकेने नियमित देखभालीची जबाबदारी चोख पार पाडली असती, तर आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर खर्च करण्याची आणि बंगला जीर्ण होण्याची वेळ आली नसती," असे मत त्यांनी व्यक्त केले.

Navi Mumbai: नवी मुंबईत खासगी शाळांची मनमानी! मैदानांवर विनापरवानगी टर्फ उभारण्याच्या प्रकारात वाढ; पालिकेकडे कारवाईची मागणी

सध्याच्या महापौरांना अद्याप अधिकृत निवासस्थान उपलब्ध नसल्याने त्यांना बाहेरूनच कामकाज पाहावे लागत आहे. या नूतनीकरण प्रक्रियेला पाच महिने लागणार असल्याने महापौरांचा 'गृहप्रवेश' सध्यातरी दूर असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी या प्रस्तावाला मंजुरी देतानाच, नूतनीकरणाचे काम विहित मुदतीत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.