प्रिय माजी मित्रवर्य मा. उधोजीसाहेब यांसी शतप्रतिशत प्रणाम! काय लिहू? लिहिण्यासारखे बरेच आहे. कुठून सुरवात करू? (हे तुमच्या भाषणासारखेच झाले...) चातक नावाचा एक पक्षी असतो. तो फक्त पावसाचेच पाणी पितो. नळाच्या किंवा बाटलीतल्या पाण्याला तोंडदेखील लावत नाही. अतिशय स्वाभिमानी पक्षी आहे. अशा चातकाने ‘पिऊ पिऊ पी पी पिऊ’ अशी साद घालत पावसाची वाट पाहावी, तशी आम्ही तुमची वाट पाहात होतो. वरिष्ठ सभागृहात तुम्ही पुन्हा अवतीर्ण व्हाल, एकदोन दिवसांकरता का होईना, पण याल, असे वाटले होते.
तुम्ही याल, मग आपण नेहमीप्रमाणे लिफ्टमध्ये भेटू, हास्यविनोद करून दिवसभर चालतील, अशा ब्रेकिंग न्यूज जोडीने देऊ, असे अनेक मांडे मी मनातल्या मनात खात होतो. तुमच्या महाविकास आघाडीतर्फे (खीक...खुक...ख्यॅक) एकमेव उमेदवार म्हणून तुमचेच नाव घोषित होणार, असे ऐकून होतो. त्यामुळे मी बेसावध राहिलो, आणि घात झाला. ऐनवेळी तुम्ही अंबादासजी दानवे यांचे नाव पुढे केले, आणि स्वत: घरातच बसलात!! इतके का आमच्यावर रुसलात? इतके का आम्ही नकोसे झालो? इतके का आमचे तोंड तुम्हाला पाहावत नाही? अंबादासजीदेखील आमचे मित्रच आहेत, पण तुमची उपस्थिती केव्हाही अधिक प्रार्थनीय नव्हती का?
गेल्या टर्ममध्ये सगळे मिळून तुम्ही जेमतेम दोन-चार दिवस आला असाल-नसाल, पण तरीही तुमच्या त्या खास खुर्चीमुळे वातावरण कसे भारलेले असे. जाऊ दे. युत्या-आघाड्यांच्या राजकारणात सगळे काही मनासारखे होत नाहीच. पण आम्ही तुम्हाला खूप खूप मिस करू!
साहेब, तुम्ही असे कां केलेत? आमदारकी अशी सोडून देणारे नेते विरळाच असतात. आमच्या पक्षातर्फे सहा उमेदवार आहेत. त्या सहा जागांसाठी सहाशे नावे रांगेत उभी होती. आम्ही काय आयुष्यभर सतरंज्याच उचलायच्या का? उमेदवारी मिळाली नाही तर समाज माध्यमांवर आमची छीथू होईल, असेही काही इच्छुकांनी समक्ष भेटून सांगितले. सहा जागा निवडताना नाकी नऊ आले. शेवटी ‘मी निवड करत नाही, तर दिल्लीतून नावे ठरतात’ असे मी स्वच्छ सांगून टाकले. महायुतीतही उमेदवार निवडण्यासाठी मला इतक्या वेळा वेषांतर करावे लागले की विचारू नका!!
वेषांतरावरून आठवले, काही दिवसांपूर्वी मध्यरात्री आपली गुप्त भेट झाल्याची ‘ब्रेकिंग न्यूज’ चालवण्यात आली होती, आठवते का? ही शुद्ध अफवा असल्याचे मी तातडीने स्पष्ट केले. माझ्या जुन्या मित्राला मी रात्री बारा वाजता का भेटेन? दुपारी बारा वाजता का नाही? असा माझा बिनतोड प्रतिसवाल होता.
काँग्रेसने तुमचा गेम केला आहे, हे उघड आहे. काँग्रेसवर माझी मदार होती. पण त्यांनीही ऐनवेळी तुमचा निर्णय स्वीकारला. पण पुढल्या राज्यसभा आणि वरिष्ठ सभागृहातील जागेवर त्यांनी क्लेम ठेवल्याची बातमी ऐकली. हे खरे आहे का? तसे असेल तर तुमच्यापाठोपाठ तुमचा भोंगाही निवृत्त होणार का? नुसत्या कल्पनेने मनाला क्लेश होतात. तुमच्यासारखे गुणीजन असे निवृत्त होत गेले तर आमच्यासारख्यांनी कुणासाठी वेषांतरे करायची? डावपेच लढवायचे?
तुम्ही सभागृहात नसणार, याचा अर्थ पुढली टर्मच्या टर्म आमच्या नशिबी दुर्भिक्ष्य! अशा कोरड्या हंगामात चातकाचे काय होणार?
अर्थात वरिष्ठ सभागृहात तुम्ही नसलात तरी तुम्हावरी आमचा लोभ कायम आहेच. तुम्ही क्लेम सोडला असला तरी ‘मातोश्री’वर मिळणाऱ्या गर्मागर्म बटाटेवड्यावरचा आमचा क्लेम कायम आहे, बरं का! (‘मी पुन्हा येईन’च्या चालीवर) फिर मिलेंगे, फिर मिलेंगे, फिर मिलेंगे!!
सदैव तुमचाच (माजी) मित्र. नानासाहेब फ.