आळंदी - येथील नॅशनल फेडरेशन ऑफ ब्लाइंड, महाराष्ट्र (NFBM) संचलित जागृती स्किल डेव्हलपमेंट सेंटर मधील विद्यार्थिनींनी १२वी (HSC) परीक्षेत यंदा ११ अंध विद्यार्थिनी परीक्षेला बसल्या होत्या आणि सर्वच विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून संस्थेने सलग १००% निकालाची परंपरा कायम राखली आहे. ही स्किल डेवलपमेंट सेंटरची पाचवी HSC बॅच असून आतापर्यंतच्या सर्व बॅचेसने शंभर टक्के निकाल नोंदवला आहे.
या वर्षी गौरी जाधव हिने ७६.६७% गुणांसह स्किल डेव्हलपमेंट सेंटर व महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. साक्षी गाडे हिने ७४.५% गुण मिळवत द्वितीय, तर अंजली ठाकूर हिने ७२.६६% गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला.
विद्यार्थिनींची स्वप्नेही तितकीच मोठी आणि प्रेरणादायी आहेत. गौरी जाधव हिला आयएएस अधिकारी बनण्याची इच्छा आहे; साक्षी गाडे समाजकार्य (MSW) क्षेत्रात करिअर करू इच्छिते; तर अंजली ठाकूर कायद्याचे शिक्षण घेऊन उच्च न्यायालयाची न्यायाधीश होण्याचे ध्येय बाळगते.
या सर्व विद्यार्थिनी मीरा कॉलेज फॉर गर्ल्स पुणे येथे शिक्षण घेत असून दररोज सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करतात. शिक्षणासोबतच त्या स्किल डेव्हलपमेंट सेंटरमध्ये विविध कौशल्यांचे प्रशिक्षण घेत आहेत, ज्यामुळे त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळत आहे.
एप्रिल २०२० मध्ये स्थापन झालेल्या स्किल डेव्हलपमेंट सेंटरमध्ये जर्मन व स्पॅनिश भाषा, संवादात्मक इंग्रजी, संगणक प्रशिक्षण, शैक्षणिक विषयांमध्ये अतिरिक्त मार्गदर्शन, आरजे (Radio Jockey) प्रशिक्षण तसेच विविध प्रमाणपत्र अभ्यासक्रम दिले जातात. गेल्या चार वर्षांत या सेंटरने विविध क्षेत्रांमध्ये सुमारे ३२ विद्यार्थिनींना यशस्वीरीत्या रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
स्किल डेव्हलपमेंट सेंटरच्या प्रमुख आरती ताकवणे म्हणाल्या, 'दृष्टीदोष असलेल्या मुलींना केवळ शिक्षणच नव्हे, तर आत्मविश्वास आणि स्वावलंबन देणे हे आमचे ध्येय आहे. या विद्यार्थिनींचे यश म्हणजे त्यांच्या जिद्दीचे आणि आमच्या टीमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फलित आहे. भविष्यातही अशाच अनेक यशकथा घडवण्याचा आमचा प्रयत्न राहील.'
दृष्टीदोष असलेल्या मुलींना सक्षम बनवून त्यांना उज्ज्वल करिअरच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या या संस्थेच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.