Dhamangaon Blaze: नागपूरमधील धामणगाव विद्यामंदिर गावात भीषण आग, ३०-४० घरे जळून खाक, लाखोंचे नुकसान
esakal May 03, 2026 02:45 AM

भिवापूर: भिवापूर तालुक्यातील धामणगाव विद्यामंदिर येथे आज एका भीषण आगीच्या घटनेने संपूर्ण गाव हादरून गेले आहे. एका अज्ञात व्यक्तीने गावाशेजारील कुटाराला लावलेल्या आगीने रौद्र रूप धारण केल्यामुळे गावातील ३० ते ४० घरे जळून खाक झाली आहेत. या आगीत शेतकऱ्यांचे कापूस पीक,सोयाबीन,हरभरा,गहू, बैलांचा चारा (कुटार आणि तनस), महत्त्वाची कागदपत्रे आणि रोकड जळून खाक झाल्याने ग्रामस्थांचे अतोनात नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गावाशेजारी असलेल्या कुटाराला कुणीतरी आग लावली होती. त्याच वेळी अचानक आलेल्या मोठ्या वादळामुळे आगीचे गोळे थेट गावातील घरांवर जाऊन पडले. पाहता पाहता आगीने संपूर्ण गावाला वेढले. आगीचा जोर इतका प्रचंड होता की ग्रामस्थांना त्यावर नियंत्रण मिळवणे अशक्य झाले. डोळ्यादेखत आपली स्वप्ने आणि कष्टाने उभे केलेले घर जळताना पाहून ग्रामस्थांच्या डोळ्यांत अश्रूंचा महापूर आला होता.सुदैवाने, आग लागताच सर्व नागरिक सतर्क झाले आणि वेळीच घराबाहेर पडल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, अनेक पाळीव प्राणी या आगीत दगावल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घरातील सोन्या-चांदीचे दागिने, कष्टाचे पैसे आणि शेतीसाठी साठवून ठेवलेला कापूस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला आहे.

नुकसानीचा नेमका आकडा अद्याप समजू शकलेला नाही, परंतु हा आकडा लाखांच्या घरात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रतिष्ठित नागरिक, पोलीस प्रशासन, तहसीलदार आणि लोकप्रतिनिधींनी घटनास्थळाकडे धाव घेतली. प्रशासनाने तातडीने अग्निशमन दलाच्या गाड्या पाचारण केल्या. सध्या अग्निशमन दलाचे जवान आणि ग्रामस्थ मिळून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहेत. आगीचा प्रकोप मोठा असल्याने पूर्णपणे विझवण्यासाठी मोठा कालावधी लागण्याची शक्यता आहे."सगळं काही संपलं, आता जगायचं कसं?" असा प्रश्न हतबल झालेल्या धामणगावच्या नागरिकांना पडला आहे. उन्हाळ्याच्या दिवसात आधीच पाण्याचे दुर्भिक्ष असताना या आगीने त्यांचे छतही हिरावून घेतले आहे. आता शासन आणि प्रशासनाने तातडीने पंचनामे करून पीडित कुटुंबांना जास्तीत जास्त आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.