ST Bus Fire : मंचरजवळ पेठ घाटात धावत्या एसटीला अचानक आग
esakal May 03, 2026 02:45 AM

मंचर : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील मंचरजवळील पेठ घाटात शुक्रवारी (ता.एक) रात्री सुमारे साडेअकराच्या सुमारास जुन्नरहून मुंबईकडे निघालेल्या एसटी बसला (क्र. MH14 BT4155) अचानक आग लागल्याची घटना घडली. मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे सर्व प्रवासी सुरक्षित बचावले असून मोठी दुर्घटना टळली.

पेठ (ता.आंबेगाव): पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर जुन्नर ते मुंबई एसटी बसला अचानक आग लागल्याने प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, बस घाटातून प्रवास करत असताना अचानक इंजिनमधून धूर निघू लागला. काही क्षणातच बसच्या पुढील भागाने पेट घेतला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चालक भगवंता सुभाष म्हस्के यांनी तत्काळ बस रस्त्याच्या कडेला घेतली आणि प्रवाशांना खाली उतरवले.

यानंतर बसमधील अग्निशामक सिलेंडरचा वापर करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला.

आगीच्या घटनेमुळे लहान मुले, महिला वप्रवाशांमध्ये घबराट पसरली होती.

चालक म्हस्के, वाहक भाऊसाहेब चंद्रभान बडे तसेच काही प्रवाशांनी मिळून आग नियंत्रणात आणली. धावपळीत दोन-तीन प्रवाशांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती आहे.

दरम्यान, नारायणगाव आगारातून दुसरी एसटी बस घटनास्थळी दाखल होण्यासाठी तब्बल दोन तासाचा कालावधी लागला. त्यामुळे अनेक प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.. त्यानंतर सर्व प्रवाशांना मुंबईकडे रवाना करण्यात आले.

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर एसटी बसच्या देखभालीकडे राज्य परिवहन महामंडळाने विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी कामगार नेते अॅड. बाळासाहेब बाणखेले यांनी केली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.