Nasrapur Crime News: चिमुकलीवर लैंगिक अत्याचार व खून प्रकरणी ६५ वर्षीय आरोपीला ७ मे पर्यंत पोलिस कोठडी
esakal May 03, 2026 02:45 AM

पुणे : चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून करणाऱ्याला येथील सत्र न्यायालयाने सात मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. विशेष न्यायाधीश एम. जी. चव्हाण यांनी हा आदेश दिला.

आरोपीच्या लैंगिक सक्षमतेची चाचणी केली जाणार असून, त्याने या पूर्वी अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत का, याचा तपास करणार असल्याचे पुणे ग्रामीण पोलिसांनी न्यायालयात सांगितले. या प्रकरणी ६५ वर्षीय आरोपीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(खून), ६४(बलात्कार), ७४ (विनयभंग करण्याच्या उद्देशाने हल्ला करणे), १३७(२), १४०(१), १४०(३) (अपहरण) यासह लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायद्यांतर्गत (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत चिमुकलीच्या आईने पुणे ग्रामीण पोलिसांकडे तक्रार दिली आहे. ही घटना शुक्रवारी (ता.१) दुपारी तीन ते रात्री आठ दरम्यान राजगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत नसरापूर गावाजवळ घडली.

पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपीला अटक करून कडेकोट बंदोबस्तात शनिवारी (ता. २) दुपारी न्यायालयात हजर केले होते. आरोपीने चिमुकल्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे, त्या अनुषंगाने त्याची वैद्यकीय तपासणी, रासायनिक विश्लेषण तपासणी आणि सक्षमतेची चाचणी करायची आहे. आरोपीने पीडित मुलीवर यापूर्वीही अत्याचार केला आहे का किंवा अशा प्रकारचे आणखी गुन्हे केले आहेत का, याबाबत तपास करायचा आहे. तसेच आरोपीला गुन्ह्यात आणखी कोणी मदत केली आहे का, याची चौकशी करायची आहे. त्यासाठी आरोपीला पोलिस कोठडी देण्यात यावी, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील अरुंधती ब्रह्मे यांनी केला. न्यायालयाने दोन पक्षाचे म्हणणे ऐकून आरोपीला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दुपारच्या सुमारास कडक बंदोबस्तात आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी, सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून आरोपीची गाडी अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी तसेच सर्व ग्रामस्थांसमोर फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली. यामुळे, काही काळ परिसरात वाहतूक कोंडी झाली होती.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.