IPL 2026, SRH vs KKR: कोलकाता नाईट रायडर्सने हैदराबादला नमवलं, प्लेऑफच्या आशा कायम
GH News May 03, 2026 10:10 PM

आयपीएल स्पर्धेच्या 45व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात लढत झाली. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकून सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी स्वीकारली. पण हा निर्णय चुकला असंच म्हणावं लागेल. कारण सनरायझर्स हैदराबादला 19 षटकात सर्व गडी गमवून 165 धावा करता आल्या आणि विजयासाठी 166 धावा दिल्या. या धावा कोलकाता नाईट रायडर्सने 19व्या षटकात 3 गडी गमवून पूर्ण केल्या. या विजयासह कोलकाता नाईट रायडर्स संघ सातव्या स्थानावर आहे. मात्र केकेआरच्या प्लेऑफच्या आशा अजूनही जिवंत आहेत. कोलकात्यासाठी प्रत्येक सामना करो या मरोची लढाई आहे. कोलकाता नाईट रायडर्सला अजून पाच सामने खेळायचे आहेत.

कोलकात्याचा डाव

आयपीएल स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादने विजयासाठी दिलेल्या 166 धावांचा पाठलाग करताना कर्णधार अजिंक्य रहाणे आणि फिन एलन यांची आश्वासक सुरुवात केली. पहिल्या विकेटसाठी या जोडीने 49 धावांची भागीदारी केली. फिन एलन 29 धावा करून बाद झाल्यानंतर अजिंक्य रहाणे आणि अंगकृष रघुवंशी यांची जोडी जमली. या जोडीने 66 चेंडूत 84 धावांची खेळी केली. अजिंक्य रहाणे 36 चेंडूत 43 धावांची खेळी करून बाद झाला. त्यानंतर रिंकु मैदानात आला, पण विजयी भागीदारी होण्यापूर्वी अंगकृष रघुवंशी 59 धावा करून बाद झाला.

सनरायझर्स हैदराबादचा डाव

सनरायझर्स हैदराबादकडून अभिषेक शर्मा आणि ट्रेव्हिस हेड ही जोडी मैदानात उतरली. या जोडीने पहिल्या विकेटसाठी 44 धावांची भागीदारी केली. अभिषेक शर्मा 10 चेंडूत 15 धावा करून बाद झाला. तर ट्रेव्हिस हेड आणि इशान किशनने डाव पुढे सरकवला. या सामन्यात ट्रेव्हिस हेडने 28 चेंडूत 9 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 61 धावा केल्या. तर इशान किशनने 29 चेंडूत 4 चौकार 2 षटकार मारत 42 धावांची खेळी केली. खरं तर दुसरी विकेट नवव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर पडली. तेव्हा संघाचा 105 धावा होत्या. त्यामुळे आरामात 200 धावा होतील असं वाटलं. पण तसं झालं नाही. हैदराबादचा डाव पत्त्यासारखा कोसळला. हेनरिक क्लासेने 11, स्मरण रविचंद्रन 4, अनिकेत वर्मा 6, सलीली अरोरा 2, पॅट कमिन्स 10, शिवांग कुमार 1, हर्षल पटेल 6 धावा करून बाद झाले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.