पुणे : झटपट श्रीमंत होण्याच्या लालसेपोटी पुणेकरांनी एकाच महिन्यात ९ कोटी ३१ लाख रुपये गमावले. केवळ शेअर बाजारातील नफ्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एप्रिल महिन्यात २४ नागरिकांना ‘एप्रिल फूल’ बनवले असून, यात अठरा वर्षांच्या तरुणासह एकाहत्तर वर्षांच्या वृद्धालाही गंडा घातल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे.
गुन्ह्याची पद्धत :
फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर खोट्या जाहिराती देऊन नागरिकांना व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जोडले जाते. सुरुवातीला किरकोळ नफा देऊन विश्वास जिंकला जातो. त्यानंतर बनावट ट्रेडिंग ॲप डाऊनलोड करायला लावून त्यात लाखो रुपयांचा आभासी नफा दाखवला जातो. मात्र, जेव्हा नागरिक पैसे काढण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा ‘प्रोसेसिंग फी’ किंवा ‘टॅक्स’च्या नावाखाली त्यांची लूट केली जाते.
फसवणूक केल्यानंतर सायबर चोरटे ती रक्कम बनावट शेल कंपन्यांच्या बँक खात्यांतून क्रिप्टो करन्सीमध्ये बदलून परदेशात वळवितात. बहुतांश गुन्हेगारांचे आयपी ॲड्रेस हाँगकाँग आणि दुबईतील असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
विश्लेषणात्मक आकडेवारी :
१. एकूण फसवणूक :
एप्रिल महिन्यात समोर आलेल्या २४ घटनांमध्ये एकूण ९ कोटी ३१ लाख रुपयांची फसवणूक झाली. यामध्ये सर्वात मोठी फसवणूक शेवाळवाडी येथील एका महिलेची दोन कोटी ३० लाख रुपये, तर दुसरी मोठी फसवणूक वानवडीतील एका वृद्धाची ९९ लाख ९९ हजार रुपये इतकी झाली आहे.
२. महिला आणि पुरुष वर्गवारी :
महिला : या आकडेवारीनुसार चार महिलांची फसवणूक झाली. विशेष म्हणजे शेवाळवाडी, वडगाव बुद्रुक, पिसोळी आणि विमाननगर येथील चार महिलांकडून चोरट्यांनी तीन कोटी ४६ लाख हजार रुपये उकळले.
पुरुष : उर्वरित २० पैकी १७ पुरुष आणि तरुणांची मिळून सुमारे पाच कोटी ८५ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे.
३. वयोगटानुसार विश्लेषण :
तरुण वर्ग (१८ ते ३० वर्षे) : झटपट श्रीमंत होण्याच्या नादात तरुणही भरडले गेले आहेत. खडक परिसरातील अवघ्या १८ वर्षीय तरुणाने चार लाख २१ हजार, तर डेक्कन परिसरातील २५ वर्षीय तरुणाने २१ लाख ७१ हजार रुपये गमावले आहेत.
मध्यमवयीन (३१ ते ५० वर्षे) : नोकरदार आणि व्यावसायिक वर्ग सर्वाधिक बळी पडला आहे. या वयोगटातील १० नागरिकांनी कोट्यवधी रुपये गमावले आहेत. मगरपट्टा येथील ४४ वर्षीय व्यक्तीने तर ९१ लाख रुपये गमावले आहेत.
ज्येष्ठ नागरिक (५१ ते ७१ वर्षे): आयुष्याची पुंजी सुरक्षित ठेवण्याऐवजी जादा परताव्याच्या लालसेपोटी ९ ज्येष्ठ नागरिकांची मोठी फसवणूक झाली आहे. यात डेक्कनमधील ७१ वर्षीय वृद्धाचे ३७ लाख ३० हजार आणि वानवडीतील ६६ वर्षीय वृद्धाचे सुमारे एक कोटी रुपये गेले आहेत.
आयटी आणि सधन पट्ट्याला लक्ष्य : मगरपट्टा, विमाननगर, खराडी, बालेवाडी, नांदेड सिटी आणि वडगाव शेरी यांसारख्या उच्चभ्रू आणि नोकरदार वस्तीतील नागरिकांची फसवणूक जास्त झाली आहे. जादा नफ्याचे आमिष दाखवले की नागरिक कोणतीही खातरजमा न करता लाखो-कोटी रुपये अनोळखी खात्यांवर वर्ग करत आहेत, हे यावरून स्पष्ट झाले आहे.
नागरिकांना आवाहन :
गुंतवणुकीसाठी केवळ सेबी नोंदणीकृत संस्थांचाच सल्ला घ्यावा.
व्हॉट्सॲप किंवा टेलिग्रामवरील अनोळखी टिप्सवर विश्वास ठेवून पैसे गुंतवू नयेत.
ट्रेडिंग ॲप्स केवळ अधिकृत ‘प्ले स्टोअर’ किंवा ‘ॲप स्टोअर’वरूनच डाऊनलोड करावेत.
फसवणूक झाल्यास संपर्क क्रमांक-
हेल्पलाइन क्रमांक १९३०
सायबर पोलिस ठाणे, शिवाजीनगर, पुणे - ७०५८७१९३७५ आणि ७०५८७१९३७१