जेऊर : सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग 465 मोहोळ‑कुरुल ‑ कामती‑बसवनगर‑औराद‑बंकलगी‑वळसंग या 81.37 किमी मार्गाच्या रुंदीकरणासाठी 740.38 कोटी रुपयांच्या तरतूदीसह मंजुरी देण्यात आली आहे.त्यामुळे औराद ते वळसंग हा महत्वाचा आणि दुर्लक्षित रस्ता पूर्ण होणार असल्याने विजयपूर भागातून सोलापूर शहरात न येता तो अक्कलकोट विधानसभा क्षेत्राला वळसंग येथे जोडला जाणार आहे.
त्यामुळे सोलापूर येथील ताण कमी होऊन अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थांच्या दर्शनास येणाऱ्या आणि कर्नाटक भागातील विजयपूर व परिसरातील अनेक भागातून नाशिक ते चेन्नई या रस्त्याला अक्कलकोट ट्रम्पेट इंटरचेंज येथे जोडला जाणार असल्याने या भागातील विकासाला मोठा मदत होणार आहे.या संदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सोसियल मीडिया द्वारे ही माहिती शेअर केली आहे.सदर प्रकल्पामध्ये सीना नदीवर मोठ्या पुलाचे बांधकाम करणे, आहेरवाडी फाट्यावर रेल्वे उड्डाणपूल बांधणे व मार्गाचे रुंदीकरण काम समाविष्ट आहे. या कामामुळे कर्नाटक राज्याकडून येणारी जड वाहतूक अधिक सुरक्षित व सुरळीत होण्यास मदत होईल, ज्यामुळे अंतरराज्यीय वाहतुकीस चालना मिळेल.
हा रस्ता सोलापूर शहराला पर्यायी बाह्यवळण रस्ता म्हणून काम करेल. तसेच शहरातून जाणारी जड वाहनांची वाहतूक या मार्गाने वळविण्यात येईल व शहरातील वाहतूक गर्दी कमी करण्यास मदत होईल.या प्रकल्पामुळे मोहोळ ते वळसंग पट्ट्यातील प्रमुख गावांचा थेट संपर्क सुधारेल, शेतमाल वाहतूक सुलभ होऊन शेतकऱ्यांना मोठा लाभ होईल, तसेच प्रवासाचा वेळ व इंधन खर्च लक्षणीयरीत्या कमी होणार आहे.
संजवाड येथे सीना नदीवरील मोठा पूल, आहेरवाडी फाटा येथे रेल्वे उड्डाणपूल तसेच विविध छोटे पूल व सीडी वर्क्सची कामे या प्रकल्पात समाविष्ट आहेत, ज्यामुळे सुरक्षित व सक्षम पायाभूत सुविधा उभारणीस चालना मिळेल. या मुळे अक्कलकोट विधानसभा क्षेत्रातील तिलाठी गेटपासून पुढे आचेगांव, वळसंग पर्यंत रस्ता या मार्गाने होणार आणि पुढे तो कर्जाळ मार्गे अक्कलकोट रस्त्याला राष्ट्रीय महामार्गास जोडला जाणार असल्याने या भागाच्या विकासाला मोठी संधी मिळणार आहे. अक्कलकोट विधानसभा भागातील रस्ते सुधारण्यासाठी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी करत असलेल्या अथक प्रयत्नाला यामुळे आणखी जोड मिळणार आहे.