Chhatrapari Sambhajinagar: अनुदानित खतांची कंपन्यांना विक्री; शेतकऱ्यांना हलक्या दर्जाचे खत, वंजारवाडीत गोदामावर छापा, चौघांवर गुन्हा
esakal May 04, 2026 01:45 PM

छत्रपती संभाजीनगर: शेतकऱ्यांना सहा रुपये प्रति किलोने अनुदानावर मिळणारे खत कंपन्यांना ७४ रुपये प्रतिकिलोने विक्री करणाऱ्या, तसेच शेतकऱ्यांना हलक्या दर्जाचे खत विक्री करणाऱ्या गोदामावर कृषी विभागाच्या पथकाने छापा मारला.

यावेळी २६ लाख ६२ हजार ७६२ रुपयांचे ११८.७४ टन खत जप्त करण्यात आले. वंजारवाडी (ता. छत्रपती संभाजीनगर) शिवारात शनिवारी (ता. दोन) कारवाई केली. मुख्य आरोपी अनिल मंत्री (रा. स्ट्रीट विष्णून, नांदेड), सचिन निंफळ (रा. समता कॉलनी, वाळूज), खत कंपनी बालाजी फॉस्फेट लिमिटेड (ए.बी. रोड औद्योगिक वसाहत, देवास, इंदूर, मध्य प्रदेश) व गणेश कृषी उद्योग (छत्रपती संभाजीनगर) यांच्यावर दौलताबाद ठाण्यात गुन्हा नोंद केला.

Assembly election results 2026 Live Update: तामिळनाडूत मोठा राजकीय उलटफेर, विजयच्या TVK चं शतक

विभागीय कृषी सहसंचालक सुनील वानखेडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आनंद गंजेवार, कृषी अधिकारी प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय भरारी पथकाचे आशिष काळुसे, खत निरीक्षक पंकज ताजणे, मेघश्याम गुळवे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक हरिभाऊ कातोरे, खत निरीक्षक दिनकर जाधव, रंगनाथ पिसाळ, राधाकृष्ण कार्ले यांनी कारवाई केली. खत निरीक्षक गोविंद पौळ यांनी फिर्याद दिली असून अधिक तपास पीएसआय वसंत शेळके करत आहेत.

तपासणी सुरू असतानाच खताचा ट्रक दाखल

मुख्य आरोपी अनिल मंत्री याच्या मालकीचे नांदेड येथे व्यंकटेश कृषी भांडार आहे. वंजारवाडी येथील गोदामात सचिन निंफळ हा त्याच्यासाठीच काम करायचा. विशेष म्हणजे तपासणी सुरू असतानाच एक ट्रक गोदामाजवळ येऊन थांबला. ट्रकमध्ये बालाजी फॉस्फेट कंपनीच्या खताच्या ५० किलोच्या ७०० बॅगा होत्या.

Kolhapur crime news : डॉक्टर महिला घरात एकटी, ओळखीच्या तरूणाकडून बलात्कार; मोबाईलवर शूट करून दिली धमकी, कोल्हापुरात धक्कादायक घटनेने खळबळ

बिलाची पाहणी केली असता, ते इंदूर येथून नांदेडच्या व्यंकटेश कृषी भांडारमार्फत याच गोदामात उतरवण्यात येत असल्याचे समोर आले. पथकाने फोनवरून अनिल मंत्री याला विचारले असता तो साठा गणेश कृषी उद्योग, छत्रपती संभाजीनगर यांना पाठवत असल्याचे त्याने सांगितले. मात्र, अधिकाऱ्यांनी परिसरातील परसोडाच्या गणेश कृषी उद्योग यांना विचारणा केली असता, असे खत त्यांनी मागवले नसल्याचे समोर आले.

काय सापडले छाप्यात?

विविध कंपन्यांच्या खतांमध्ये इतर ग्रेडचे मिक्स केलेले खत आढळले. कंपन्यांना अनुदानित ६५० रुपयांची खतांची एक गोणी २२५० रुपयांनी विकली जात होती. यासाठी शासकीय अनुदानित गोणीची हुबेहूब नक्कल करत तशी गोणी छापली जात होती. अशा एकूण १४ हजार ३५५ रिकाम्या गोण्या आणि या गोण्या सीलबंद करण्यासाठी शिलाई मशीनही जप्त करण्यात आली.

"विविध कंपन्यांच्या छापील बनावट रिकाम्या बॅगेत खत भरून पॅकिंग करत असल्याचे आरोपी सचिन निंफळने कबूल केले आहे. ट्रक गोदामात लावला असून खतांसह गोदाम सील केले आहे."

- हरीभाऊ कातोरे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, छत्रपती संभाजीनगर

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.