देशाचं लक्ष लागलेल्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे (Vidhansabha election) निकाल हाती येत असून पहिल्या टप्यात पश्चिम बंगालमध्ये (West bengal) भाजपने आघाडी घेतल्याचं दिसून येत आहे. तर, केरळमध्ये डाव्यांना मागे सारत काँग्रेसची घोडदौड पाहायला मिळत आहे. केरळमधील विधानसभेच्या 140 जागांपैकी काँग्रेस शतकाच्या उंबरठ्यावर असल्याने काँग्रेस केरळचा गड जिंकण्याची शक्यता आहे. पाच राज्यातील सर्वात लहान राज्य आणि विधानसभा असलेल्या पद्दुचेरीमध्ये विधानसभेच्या 30 जागांसाठी मतदान झाले असून बहुमताचा आकडा गाठण्यासाठी 16 जागा जिंकायची गरज आहे. येथील सुरुवातीच्या निकालाच्या कलानुसार भाजपने जोरदार मुसंडी मारली असून 22 जागांवर भाजपने आघाडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे.
केंद्र शासित प्रदेश असले्ल्या पद्दुचेरीमधील 6 मतमोजणी केंद्रावरुन विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती येत असून भाजपने 20 हून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. तर, काँग्रेस आघाडीने 6 जागांवर आघाडी घेतल्याचं चित्र आहे. त्यामुळे, पद्दुचेरीमध्येही भाजपचे कमळच खुलणार असल्याचे दिसून येते. येथे मुख्य लढत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA - एआयएनआरसी + भाजप) विरुद्ध काँग्रेस-द्रमुक आघाडीमध्ये आहे. देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजप 3 राज्यात आघाडीवर असून पश्चिम बंगाल,आसाम आणि पद्दुचेरी राज्यात भाजपने मोठी आघाडी घेत बहुमताचा आकडा गाठल्याचं चित्र दिसून येतं.
दरम्यान, 2021 मध्ये झालेल्या पद्दुचेरीमधील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या (राष्ट्रीय लोकशाही आघाडीने) सत्ता स्थापन केली होती. अखिल भारतीय एनआर काँग्रेसचे संस्थापक एन. रंगास्वामी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. भाजपसोबत आघाडीमध्ये हे सरकार स्थापन झाले होते. आता, यंदाही भाजप आघाडीनेच येथे सत्तेकडे वाटचाल केल्याचं दिसून येत आहे. यंदा पद्दुचेरीमध्ये विधानसभेच्या 30 जागांसाठी 89.87 टक्के मतदान झाले असून 13 हजार मतदारांनी पोस्टल मताने आपला मतदानाचा हक्क बजावला.
पश्चिम बंगालच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. येथे सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये अतिशय अटीतटीची लढत पाहायला मिळत असून बंगालमधील 294 पैकी 293 जागांचा निकाल आज जाहीर होत आहे. येथील 'फालटा' या एका जागेसाठी पुन्हा मतदान होणार असल्याने त्याचा निकाल 24 मे रोजी जाहीर केला जाणार आहे. आज आलेल्या निवडणूक निकालांपैकी भाजपने जोरदार मुसंडी मारली असून 190 जागांवर आघाडी घेतल्याचं चित्र आहे. त्यामुळे, येथे गेल्या 15 वर्षांपासून सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या सत्तेला सुरुंग लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, तामिळनाडूमध्येही डीएमके आघाडी आणि टीव्हीके यांच्यात सुरुवातीला आलेल्या निवडणूक निकालांतून जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे.