EPFO E PRAAPTI Portal: नोकरी बदल्यानंतर अनेकदा कर्मचारी पीएफ खाते विसरून जातात. अथवा कंपनीशी वाजलेले असेल तर पीएफ खात्याची सेटलमेंट लांबते. कर्मचाऱ्यांना अशा खात्याचा विसर पडतो. त्या खात्यातील रक्कम अनेक वर्षे तशीच निष्क्रिय पडून असते. ही अडचण दूर करण्यासाठी केंद्रीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) एक नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म आणला आहे. त्यामुळे जुने पीएफ खाते हुडकणे आणि त्यातील रक्कम काढणे सोपे होणार आहे.
काय आहे E-PRAAPTI पोर्टल
E-PRAAPTI म्हणजे ‘EPF Aadhaar-Based Access Portal for Tracking Inoperative Accounts’ असे संकेतस्थळ आहे. जुन्या आणि निष्क्रिय पीएफ खात्याचा शोध घेण्यासाठी ते तयार करण्यात आले आहे. या पोर्टलची घोषणा कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी केली आहे. या पोर्टलाचा उद्देश देशातील कोट्यवधी कर्मचाऱ्यांना मदत करण्यासाठी होतो. त्यामुळे जुन्या पीएफ खात्याची माहिती शोधता येणार आहे. तुमचे जुने निष्क्रिय पीएफ खाते शोधता येईल आणि त्यातील रक्कम काढता येईल.
विना UAN पण शोधता येणार तुमचे खाते
या पोर्टलचे खास वैशिष्ट्ये म्हणजे या पोर्टलवर लॉगिन करण्यासाठी UAN ची गरज नसेल. साधारणपणे PF खात्यापर्यंत पोहचण्यासाठी UAN ची गरज असते. पण E-PRAAPTI च्या माध्यमातून हा अडथळा दूर होणार आहे. त्याचा देशातील कोट्यवधी सदस्यांना फायदा होईल. ज्या लोकांकडे UAN नाही अथवा ज्यांना युएएन आठवत नाही, त्यांना आता पीएफ खात्यातील रक्कम काढता येईल.
आधाराच्या मदतीने पटवण्यात येणार ओळख
E-PRAAPTI पोर्टल हे पूर्णपणे आधार कार्डशी संबंधित असेल. युझर्स हे आधार कार्डच्या सहाय्याने त्यांची ओळख पटवून देतील. त्यानंतर सिस्टिम स्वतःहून स्वयंचलितपणे जुने आणि निष्क्रिय PF खाते शोधन ते समोर आणेल. त्याआधारे या खात्यातील जी काही रक्कम असेल, ती सदस्याला काढता येईल.
जुन्या कंपनीची काहीच नाही गरज, ‘आधार’ कार्डमुळे थेट प्रवेश
ई-प्राप्ती पोर्टलवर कर्मचाऱ्यांना त्यांचे जुने आणि निष्क्रिय पीएफ खाते शोधता येतील. त्यासाठी आधार कार्डचा वापर करता येईल. विशेष म्हणजे जुने पीएफ खाते सक्रिय करण्यासाठी जुन्या कंपनीच्या मालकाशी, एचआरशी कोणताही संपर्क साधण्याची गरज उरणार नाही. त्यासाठी विशेष कागदपत्रांची गरज नसेल. तुमचे आधार कार्डच जुने पीएफ खाते शोधून देण्याचे काम करेल.