मराठा साम्राज्याचा विस्तार दाखवणारा NCERT च्या पुस्तकातून नकाशा वगळण्याचा वादाचा पुढचा अंक; राजघराण्यांची मुंबई उच्च न्यायालयात धाव, जनहित याचिका दाखल
सचिन गाड May 06, 2026 04:13 PM

पुणे : एनसीईआरटीच्या (NCERT) इयत्ता आठवीच्या इतिहासाच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा (Maratha Empire) विस्तार दर्शवणारा नकाशा हटवण्याच्या निर्णयामुळे महाराष्ट्रात दिवसागणिक तीव्र संतापाची लाट उसळ आहे. मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाशी छेडछाड केल्याचा आरोप करत राज्यभरातून विरोधाचा आवाज उठवण्यात येत आहे. सुरुवातीला हिंदी भाषेतील पुस्तकातून हा नकाशा (Maratha Empire Map) हटवण्यात आला होता. त्यानंतर राज्याचे शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर (Education Minister Pankaj Bhoyar) यांनी या संदर्भात एनसीईआरटीसोबत पत्रव्यवहार करून योग्य तो पाठपुरावा केला जाईल, असे विधानमंडळात सांगितले होते. मात्र, त्यानंतरही कोणतीही दखल न घेता आता इंग्रजी भाषेतील पुस्तकातूनही मराठा साम्राज्याचा नकाशा हटवण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, शिक्षण मंत्र्यांना एनसीईआरटीकडून अक्षरशः वाटाण्याच्या अक्षता लावल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. दरम्यान, इयत्ता आठवीच्या सामाजिक शास्त्राच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा वगळण्याचा वाद आता थेट मुंबई उच्च न्यायालयापर्यंत जाऊन पोहचला आहे. महाराष्ट्रातील राजघराण्यांनी या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून पुढे कायद्याची लढाई लढण्याचा देखील पवित्रा घेण्यात आला आहे. (NCERT Removed Maratha Empire Map)

नागपूरच्या भोसले राजघराण्याचे वर्तमान वंशज मुधोजीराजे भोसले (Raje Mudhoji Bhosle) यांनी सुरवातीपासूनच या विषयाबाबत आक्रमक भूमिका घेत हे प्रकरण लावून धरलं होतं. यात आता जिजाऊ घराण्याचे शिवाजी दत्तात्रय राजे जाधव आणि रायगडचे रघोजीराजे शाहाजीराजे आंग्रे याचिकाकर्ते असून यांच्या वतीने ॲड. आशिष गायकवाड यांनी जनहित याचिका दाखल केली आहे.

मराठा साम्राज्याचा नकाशा वगळण्याचा निर्णय मनमानी तसेच एकतर्फी (NCERT Maratha Empire Map)

इयत्ता 8 वीच्या Exploring Society: India and Beyond – Part I “या सामाजिक शास्त्राच्या पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा मार्च महिन्यात गुपचुप वगळण्यात आला होता. याबाबत आक्षेप घेत एनसीईआरटीच्या निर्णयाला जनहित याचिकेच्या माध्यमातून आव्हान देण्यात आलं आहे. जुलै 2025 मधील इयत्ता 8 वीच्या पुस्तकाच्या युनिट 3, पृष्ठ 71 वरील फिगर 3.11 मध्ये इ.स. 1759 मधील मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविण्यात आला होता. मात्र, राजस्थानमधील माजी राजघराण्यांनी तसेच राजकीय पुढार्यांच्या आक्षेप घेतल्यानंतर मराठा साम्राज्याचा नकाशा गुपचुप वगळण्यात आला असल्याचा आरोप करण्यात येते आहे. नकाशात जैसलमेर संस्थान आणि त्याअनुषंगाने राजस्थानातील काही भाग मराठा साम्राज्याच्या नियंत्रणाखाली दाखवण्यात आल्याने त्याला आक्षेप घेण्यात आला होता. मराठा साम्राज्याचा नकाशा वगळण्याचा निर्णय मनमानी तसेच एकतर्फी आल्याचा याचिकेत दावा करण्यात आला असून हा विषय आता न्यायालयापर्यंत पोहचाल आहे. तसेच हा निर्णय, ऐतिहासिक पुरावे, अभिलेखीय नोंदी किंवा शैक्षणिक अभ्यास न तपासता घेण्यात आल्याचा याचिकेत आरोप करण्यात आला आहे.

याचिकाकर्ते कोण? (NCERT Maratha Empire Map)

1) राजे मुधोजी महाराज भोंसले, नागपूर.

2) शिवाजीराजे जाधव, सिंदखेडराजा.

3) श्रृषीकेश निकम पाटील, छत्रपती संभाजीनगर.

4) रघुजीराजे आंग्रे, अलीबाग.

5) रविंद्र पडवळ, पुणे.

6) कुणाल मालुसरे,पुणे

7) राम नारायण मराठा, पानीपत (हरीयाणा)

शरद मोडे, बीड

9) अर्थव मारणे, पुणे.

याचिकेतील मुख्य मुद्दे:  (NCERT Removed Maratha Empire Map)

इतिहासाचे विद्रुपीकरण:  याचिकेत असे नमूद करण्यात आले आहे की, मराठा साम्राज्याने अठराव्या शतकात भारताच्या मोठ्या भूभागावर अधिपत्य गाजवले होते. मात्र, NCERT ने नवीन बदलांमध्ये हा ऐतिहासिक नकाशा वगळून नवीन पिढीला खऱ्या इतिहासापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.

अस्मितेचा प्रश्न: मराठा साम्राज्य हे केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून ते अटकेपार पसरलेले राष्ट्रव्यापी साम्राज्य होते. असा नकाशा हटवणे हा छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या वारसांच्या कर्तृत्वाचा, महाराष्ट्रातील व भारतातील आठरापगड जातीचा अपमान असल्याची भावना याचिकेत व्यक्त करण्यात आली आहे.

मागणी: उच्च न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करून NCERT ला सुधारित पाठ्यपुस्तकात मराठा साम्राज्याचा नकाशा पुन्हा समाविष्ट करण्याचे आदेश द्यावेत, अशी मुख्य मागणी करण्यात आली आहे.

"आपल्या पूर्वजांनी रक्ताचे पाणी करून हे स्वराज्य आणि साम्राज्य उभे केले. जगाला हेवा वाटेल असा आपला इतिहास आहे. हा इतिहास पुसण्याचा किंवा तो कमी लेखण्याचा प्रयत्न होत असेल, तर आम्ही गप्प बसणार नाही. भावी पिढीला शुद्ध आणि सत्य इतिहास मिळावा, यासाठीच आम्ही हा न्यायालयीन लढा पुकारला आहे." असेही यावेळी मुधोजीराजे भोसले यांनी यावेळी सांगितलं.

इतर महत्वाच्या बातम्या

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.