पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या विजयानंतर अशोक चव्हाणांनी काँग्रेसची लाज काढली, म्हणाले, 'काँग्रेस हा नेतृत्त्वहीन पक्ष, आतातरी...'
जयदीप मेढे May 04, 2026 07:43 PM

Assembly Election Results 2026: देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज (सोमवारी) जाहीर झाला. पश्चिम बंगाल, आसाम, पुद्दुचेरी, तामिळनाडू आणि केरळ या पाचही राज्यांमध्ये आज सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. यामध्ये पश्चिम बंगालमध्ये भाजपला (BJP) घवघवीत यश मिळाले. तर आसामध्येही भाजपने पुन्हा एकदा सत्ता राखण्यात यश मिळवले. तर केरळमध्ये डाव्यांचा शेवटचा गड पडला असून याठिकाणी काँग्रेसची सत्ता येण्याची शक्यता आहे. तर तामिळनाडूमध्ये विजय थलपति याच्या टीव्हीके पक्षाने मुसंडी मारत द्रमुक आणि अण्णाद्रमुकला मागे टाकले. तर पुद्दुचेरीमध्येही भाजपने यश मिळवले आहे. (Vidhansabha Election Result 2026) तर या ५ राज्याच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने कमावलेल्या कामगिरीवरती भाजप नेते आणि राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनी हल्लाबोल करत लाज काढली आहे.

माध्यमांशी बोलताना राज्यसभा खासदार अशोक चव्हाण म्हणाले की, मला अतिशय आनंद आहे की, आज ज्या राज्यांचे निकाल समोर आले, या पाच राज्यांच्या निवडणुकीत त्यामधून आपण पाहाल पश्चिम बंगालमध्ये  भाजपचा दणदणीत विजय झाला आहे. तृणमूल काँग्रेसचा फार मोठा पराभव झाला आहे. तीन टर्मपासून असलेली ममता बॅनर्जी यांची सत्ता गेली आहे. लोकांना वाटलं नव्हतं, पण आम्हाला खात्री होती. ज्या पद्धतीने मोदी साहेबांनी आणि अमित भाईंनी लोकांना भेटून आपली भूमिका पटवून दिली, अँटी इन्कन्म्बन्सी फॅक्टर त्याठिकाणी मोठ्या प्रमाणावर होता. पुद्दुचेरीत भाजप आघाडी सत्तास्थापन करेल. मोदीजींची एकूण विकसित भारताची संकल्पना आणि विकासकामं हे पाहून लोकांनी मोदींच्या नेतृत्त्वावर शिक्कामोर्तब केले असं म्हणत चव्हाणांनी भाजपचं कौतुक केलं आहे. 

तर मोदीजींच्या निर्णयाला प्रत्येक ठिकाणी विरोध करायचा प्रयत्न जो विरोधकांनी केला, त्याला लोकांनी जुमानलं नाही. महिला आरक्षण विधेयकाला विरोध केल्यामुळे महिलांचा विरोधकांविरोधात रोष दिसून आला. पश्चिम बंगालमध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणावर तृणमूल काँग्रेसला विरोध केला असावा, आमचा अंदाज आहे. ऑपरेशन सिंदूरबाबत शंका व्यक्त करुन अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून देशाविषयी शंका उपस्थित करणाऱ्यांना चांगले उत्तर मिळाले आहे. पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये काँग्रेसचा मोठा पराभव झाला. काँग्रेस हा नेतृत्त्वहीन पक्ष झाला आहे. आतातरी त्यांनी शहाणं व्हावं, असंही अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.

West Bengal Election 2026: विकासाचे राजकारण चालते, हे बंगालमध्ये सिद्ध : विनोद तावडे

त्याचबरोबर भाजप नेते आणि खासदार विनोद तावडे यांनी भाजपच्या विजयावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, तुष्टीकरणाचे राजकारण चालणार नाही. विकासाचे राजकारण चालते, हे बंगालमध्ये सिद्ध झाले. आसाममध्ये पुन्हा एकदा भाजपचे सरकार येत आहे. तामिळनाडूत खूप चांगल्या पद्धतीने भाजपच्या जागा वाढल्या आहेत. त्याठिकाणी स्थानिक नवीन पक्ष पुढे आहे. स्वाभाविकपणे अँटी इन्कम्बन्सी दोघांमध्ये विभागली आहे. पुद्दुचेरीमध्ये भाजप आहे, केरळमध्ये आम्ही खातं उघडत आहोत, आमची मतांची टक्केवारी वाढत आहे. पण आजचा खरा विजय पश्चिम बंगालमधील आहे. कारण बंगाल केवळ एक राज्य नाही, एक सीमावर्ती प्रदेश आहे. तिथून मुंबईपर्यंत बांगलादेशी येतात आणि आपले उद्योग व्यवसाय बसवतात. बंगालच्या विजयाने आपल्या देशाचे अनेक प्रश्न सुटणार आहेत. 

West Bengal Election 2026:  दिवा विझताना मोठा होतो : संजय राऊत

पश्चिम बंगालमध्ये भाजपचा विजय झाला. दिवा विझताना मोठा होतो, आता त्यांचं कार्य संपलेले आहे. बंगालमध्ये  30 ते 35 मतदान केंद्रावर मतमोजणी थांबली आहे. अनेक मतदान केंद्रावर भाजपचे कार्यकर्ते लूट करत आहेत. सीआरपीएफची मदत भाजपच्या कार्यकर्त्यांना आहे. भारतीय जनता पक्ष पश्चिम बंगालमध्ये सत्ता घेताना दिसत आहे.  मोदी आणि शहा यांचं स्वप्न अखेरचं पूर्ण झालं आहे. त्यामुळे मोदी- शहा यांचं राष्ट्रीय स्तरावरच कार्य संपलेले दिसत आहे. एसआयआर, धर्मांतर या सगळ्या विषयावर त्यांचा पराभव रोखण्यात आला. भाजपला सरळ मार्गाने हा विजय मिळालेला नाही, असं शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.