Bollywood Actor Pran Struggle Life: हिंदी सिनेसृष्टीचा सुवर्णकाळ, ज्या काळात प्रत्येकाचंच स्वप्न नायक बनून रुपेरी पडद्यावर अधिराज्य गाजवण्याचं होतं, पण त्यावेळी बॉलिवूडचा असा एक नायक, ज्यानं या प्रथेला छेद दिला आणि स्वतःचा एक वेगळा मार्ग निवडला. ज्या काळात प्रत्येकजण रुपेरी पडद्यावर हिरो बनण्यासाठी धडपडत होतं, त्या काळात या सुपरस्टार अभिनेत्यानं खुंखार व्हिलन बनण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या याच निर्णयाच्या जोरावर तो प्रसिद्धीच्या सर्वोच्च शिखरावर जाऊन पोहोचला. आम्ही ज्या अभिनेत्याबाबत बोलतोय, तो अभिनेता म्हणजे, बॉलिवूडचे प्रख्यात खलनायक, 'प्राण कृष्णन सिकंद' (Pran Krishan Sikand).
अभिनेते प्राण म्हणजे, सिनेसृष्टीतलं असं एक नाव होतं, जे उच्चारताच प्रेक्षकांच्या मनात एकाच वेळी भीती आणि संतापाची भावना जागृत व्हायची. त्यांनी साकारलेल्या खलनायकाचा प्रभाव इतका खोलवर रुजलेला होता की, प्रत्यक्ष आयुष्यात त्यांची गाठ पडली, तरीही लोक अनेकदा घाबरायचे. त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव, त्यांचा तो भारदस्त आवाज, खलनायक म्हणून त्यांची प्रतिमा खुलवण्यासाठी आणखी महत्त्वाचा ठरला खलनायकाच्या भूमिकेत त्यांनी अशी काही अमिट छाप उमटवली की, हीच त्यांची 'खलनायकी प्रतिमा' पुढे त्यांची सर्वात मोठी ताकद बनली. यशाच्या एकेक पायऱ्या चढत, प्राण यांनी सिनेसृष्टीत असं एक अढळ स्थान प्राप्त केलं की, 2013 साली भारत सरकारनं त्यांना सिनेसृष्टीतील सर्वोच्च सन्मान, 'दादासाहेब फाळके पुरस्कार', प्रदान करून गौरवलं.
आजच्या जेन झी पिढीला कदाचित 'प्राण' हे नाव फारसे परिचित नसेल, पण एक काळ असा होता की, जेव्हा सिनेसृष्टीतील अगदी दिग्गज तारेही त्यांच्यासोबत पडद्यावर झळकण्याच्या कल्पनेनंच धास्तावून जायचे. त्यांच्या अभिनयाची ताकद इतकी जबरदस्त होती की, अनेक वर्ष भारतीय कुटुंबांनी आपल्या मुलांना 'प्राण' हे नाव देणं टाळलं. त्यांनी ज्या-ज्या सिनेमांमध्ये काम केलं, त्या प्रत्येक सिनेमात त्यांना एक वेगळं आणि स्वतंत्र क्रेडिट दिलं जायचं. त्या काळात, प्राण सिनेसृष्टीतील सर्वात यशस्वी आणि सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जायचे.
6 दशकांपासून सुरू असलेल्या आपल्या करियरमध्ये प्राण यांनी 360 हून अधिक फिल्म्स केल्या. 'मधुमति', 'उपकार', 'शहीद', 'जिस देश में गंगा बहती है', 'पूरब और पश्चिम', 'राम और श्याम', 'जंजीर', 'डॉन', 'अमर अकबर एंथनी' ही त्यांच्या काही सुपरहिट ठरलेल्या सिनेमांपैकी मोजकी नावं. प्राण यांनी साकारलेल्या भूमिकांचे फोटो आजही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यांच्या फोटोमधूनही त्यांचा तो भारदस्तपणा आपल्याला जाणवतो. कधी त्यांनी अमिताभ यांचा गाजलेला सिनेमा 'जंजीर'मध्ये 'शेर खान' साकारला, तर कधी 'जिस देश में गंगा बहती है'मध्ये 'राका'.
पडद्यावर जरी प्राण यांची प्रतिमा एखाद्या करारी आणि धाक निर्माण करणाऱ्या व्यक्तीची असली, तरी खऱ्या आयुष्यात त्यांनी अनेक सहकलाकारांचं करिअर टिकवून ठेवण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. या अभिनेत्यानं अनेक दिग्गज कलाकारांच्या सिनेमांमध्ये काम करण्यासाठी पुढाकार घेतला आणि त्यांना कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्यास मदत केली. जेव्हा 'मेरा नाम जोकर' हा सिनेमा अपयशी ठरल्यामुळे राज कपूर यांच्यावर आर्थिक संकटाचा डोंगर कोसळला होता, तेव्हा प्राण यांनी त्यांचा पुढचा सिनेमा 'बॉबी'मध्ये काम करण्यास सहमती दर्शवली. 'जंजीर' या सिनेमाच्या यशातही प्राण यांचा मोलाचा वाटा होता. कारण त्या काळात, अमिताभ बच्चन हे एखादा हिट सिनेमा देऊ शकतील, यावर फार कमी लोकांचा विश्वास होता. पुढे, स्वतःची तब्येत ढासळत असतानाही, प्राण पुन्हा एकदा बच्चन यांच्या मदतीला धावले. एक वेळ अशी होती, ज्याकाळात सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यापेक्षाही कित्येक पटींनी जास्त मानधन प्राण घ्यायचे.