दोन दिवसांपूर्वी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. यात पश्चिम बंगालच्या निवडणूक निकालाकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं होतं. पश्चिम बंगालमधील भाजपच्या प्रचंड विजयाने अनेक राजकीय पंडितांना धक्का दिला आहे. 294 सदस्यांच्या पश्चिम बंगाल विधानसभेत भाजपने तब्बल 200 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवला आहे. या घवघवीत यशाची अमेरिकेच्या व्हाइट हाऊसने सुद्धा दखल घेतली आहे. भाजपच्या या प्रचंड विजयाची शेजारी देशांमध्ये सुद्धा चर्चा आहे. पश्चिम बंगाल निवडणूक निकालाने खासकरुन बांग्लादेशची चिंता वाढवली आहे. त्यांच्या सरकारने भले असं म्हटलं आहे की, एका राज्याच्या निवडणूक निकालाने आमचं परराष्ट्र धोरण प्रभावित होणार नाही. ही निवडणूक भारताचा अंतर्गत विषय आहे. पण या निवडणुकीत बांग्लादेशींची घुसखोरी एक प्रमुख मुद्दा होता.
सरकार आल्यानंतर बांग्लादेशी घुसखोरांना हु्सकावून लावणार हे भाजपने आधीच जाहीर केलं आहे. त्यामुळे या घुसखोरीच्या मुद्यावरुन दोन्ही देशातील संबंधांवर प्रभाव पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पश्चिम बंगाल निवडणुकीतील विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपती ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना या ऐतिहासिक आणि निर्णायक निवडणूक विजयासाठी शुभेच्छा दिल्या आहेत असं व्हाइट हाऊसचे प्रवक्ते कुश देसाई म्हणाले. मागच्याच महिन्यात पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवर चर्चा झाली होती. त्यावेळी ट्रम्प शुभेच्छा देताना म्हणालेले की, ‘भारत भाग्यवान आहे, त्यांच्याकडे असा नेता आहे’ असं व्हाइट हाऊसकडून सांगण्यात आलं.
भाजपसाठी हा विजय खूप खास का आहे?
भाजपने पश्चिम बंगालमध्ये विजय मिळवताना ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेसची 15 वर्षांची सत्ता उलथवून टाकली. भाजपकडून या निवडणुकीत भ्रष्टाचार, बांग्लादेशींची घुसखोरी, कायदा-सुव्यवस्था, बेरोजगारी हे प्रमुख मुद्दे होते. भाजपसाठी हा विजय खूप खास आहे. कारण भाजपकडे उत्तरेतला पक्ष म्हणून पाहिलं जातं. पश्चिम बंगालची भाषा, संस्कृती वेगळी आहे. अशा राज्यात भाजपचा हिंदुत्वाचा विचार स्वीकारलं जाणं ही खूप मोठी गोष्ट आहे. भाजपला पश्चिम बंगाल जिंकण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. कारण पश्चिम बंगालच्या राजकारणाला हिंसाचाराची पार्श्वभूमी आहे.
मग तृणमुलने भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी हेच केलं
पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराची ही परंपरा डाव्यांपासून सुरु आहे. आधी डाव्यांनी तृणमुल कार्यकर्त्यांवर हल्ले केले. अगदी ममता बॅनर्जी सुद्धा यामधून सुटल्या नाहीत. मग तृणमुलने भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी हेच केलं. आता पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर आल्यानंतर भाजपला या राजकारणात अमूलाग्र बदल करावा लागेल.