Maharashtra Cabinet: मंत्रिमंडळाचा माेठा निर्णय! राज्यात २४ आश्रमशाळांना श्रेणीवाढ, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस हातभार लागणार..
esakal May 06, 2026 11:45 AM

मुंबई: स्वयंसेवी संस्थांकडून चालविण्यात येणाऱ्या पाच प्राथमिक आश्रमशाळांची माध्यमिक स्तरापर्यंत आणि १९ माध्यमिक शाळांची उच्च माध्यमिक-कनिष्ठ महाविद्यालय स्तरापर्यंत श्रेणीवाढ करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस मोठा हातभार लागणार आहे. या आश्रमशाळांची श्रेणीवाढ केल्याने आवश्यक अशा पदनिर्मितीस व त्यासाठी खर्चाच्या तरतुदीसही या बैठकीत मान्यता देण्यात आली.

Education Success Story: शेतमजूर कुटुंबातील मयुरी लावंडची झेप; बारावीत ८६% गुणांसह कॉलेजमध्ये प्रथम क्रमांक, जिद्द आणि मेहनतीचा विजय!

राज्यातील डोंगराळ व दुर्गम भागातील आदिवासी समाजात शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी १९७२-७३ पासून ‘आश्रमशाळा समूह योजना’ सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत स्वयंसेवी संस्थांकडून ५५६ अनुदानित आश्रमशाळा चालविल्या जातात. त्यापैकी ३७ प्राथमिक अनुदानित आश्रमशाळा (इयत्ता पहिली ते सातवी) व ३१९ माध्यमिक अनुदानित आश्रमशाळा (पहिली ते दहावी) आहेत.

तसेच माध्यमिक आश्रमशाळा संलग्न २०० कनिष्ठ महाविद्यालये (पहिली ते बारावी) सुरू आहेत. या शाळांमध्ये सुमारे दोन लाख ६१ हजार ८३६ (एक लाख ४० हजार २५४ मुले आणि एक लाख २१ हजार ५८२ मुली) विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळा दुर्गम, डोंगराळ किंवा नक्षलग्रस्त अशा भागात आहेत.


आर्थिक परिस्थितीमुळे आदिवासी विद्यार्थी तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन पुढील शिक्षण घेण्यास उत्सुक नसतात. त्यामुळे गळतीत वाढ होऊन विद्यार्थी माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षणापासून वंचित राहतात. त्यामध्ये मुलींची संख्या मोठी असते. यासाठी या विद्यार्थ्यांना त्यांच्या परिसरातच निवासी शिक्षण उपलब्ध करून देण्यावर शासनाचा भर आहे. याशिवाय राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगानेही आदिवासी विकास विभागाला अनुदानित आश्रमशाळांना प्रोत्साहन देण्याची शिफारस केली आहे.

त्यानुसार पाच प्राथमिक आश्रमशाळांची श्रेणीवाढ करून तिथे आठवी ते दहावीचे वर्ग सुरू करण्यास तसेच माध्यमिक अनुदानित आदिवासी आश्रमशाळांमध्ये १८ ठिकाणी कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय (इयत्ता अकरावी व बारावी कला व विज्ञान शाखा) व एका ठिकाणी केवळ अकरावी व बारावी कला अशा १९ अनुदानित माध्यमिक आश्रमशाळा संलग्न कनिष्ठ महाविद्यालये सुरू करण्यास मान्यता देण्यात आली.

सोलापूरमध्ये नवे अभियांत्रिकी महाविद्यालय

सोलापूरला नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यास व सोलापूरच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये पदवीस्तरावरचे तीन अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरू करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

श्रेणीवाढ केलेल्या पाच प्राथमिक शाळा

श्री महात्मा मुंगसाजी शिक्षण संस्थेची आश्रमशाळा (बाळापूर आखाडा, ता. कळमनुरी, जि. हिंगोली), अश्वमेध जीवन विकास प्रेरणा संस्थेची चतुरजी उके आदिवासी अनुदानित आश्रमशाळा (रेवसा, ता.जि. अमरावती), आदिवासी उन्नती सेवा मंडळाची अनुदानित प्राथमिक आश्रमशाळा (राजूर, ता. अकोले, जि. अहिल्यानगर), सुभाष शिक्षण प्रसारक मंडळाची अनुदानित आश्रमशाळा (मांडवा, ता. किनवट, जि. नांदेड), सद्गुरू दत्त धार्मिक एवं पारमार्थिक ट्रस्ट (इंदूर) संचलित सूर्योदय पारधी समाज आदिवासी अनुदानित आश्रमशाळा (सजनपुरी, ता. खामगाव जि. बुलडाणा).

MPSC Success Story: आर्थिक परिस्थितीवर मात करत अजय सुतारचा पराक्रम; जिद्द आणि मेहनतीची कमाल, पहिल्याच प्रयत्नात PSI पदाला गवसणी! श्रेणीवाढ केलेल्या १९ माध्यमिक शाळा

मार्की, ता. झरी जामणी (जि.यवतमाळ),

खापरी, ता. कळमेश्वर (जि. नागपूर),

वीर बिरसामुंडा अनुदानित आश्रमशाळा, सालेकसा, ता. सालेकसा (जि. गोंदिया),

गोंडपिंपरी, ता. गोंडपिंपरी (जि. चंद्रपूर),

गोजोली, ता. गोंडपिंपरी (जि. चंद्रपूर),

श्रीमती विठाबाई मुन अनुदानित आश्रमशाळा, डोंगरगाव, ता. मूल, (जि. चंद्रपूर),

वायंगाव निपाणी (जि. वर्धा),

आश्रमशाळा गडद, ता. नवापूर (जि. नंदुरबार),

अनुदानित आश्रमशाळा, गुही, ता. सुरगाणा (जि. नाशिक),

अनुदानित माध्यमिक आश्रमशाळा, बिलाडी (जि. धुळे),

अनुदानित आश्रमशाळा, नारा, ता. कारंजा (जि. वर्धा),

अनुदानित आश्रमशाळा, अंतुर्ली, ता. अमळनेर (जि. जळगाव)

श्री गजाननमहाराज अनुदानित आदिवासी आश्रम शाळा, शेगाव (जि. बुलडाणा),

अनुदानित आश्रमशाळा, उत्तेखोल, ता. माणगाव (जि. रायगड),

स्व. गंगाधराव कोरडे अनुदानित आदिवासी प्राथमिक-माध्यमिक आश्रमशाळा, पिठोरी, ता. नरखेड (जि. नागपूर),

राजीव प्राथमिक व माध्यमिक अनुदानित आश्रमशाळा, पाटण, ता. झरीजामणी (जि. यवतमाळ),

पुनरुत्थान समरसता गुरूकुल अनुदानित माध्यमिक आश्रमशाळा, चिंचवड (जि. पुणे),

मातोश्री मिराबाई अनुदानित प्राथमिक-माध्यमिक आश्रमशाळा, नवेगांव धापे (जि. गोंदिया),

अनुदानित आश्रमशाळा देवठाण, ता. अकोले (जि. अहिल्यानगर)

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.