अमूबाळ : (सहज फोन फिरवत) हाय ब्रो, कसा आहेस?
आदूदादा : हाय देअर, यंग मॅन, हाऊ इज यु?
अमूबाळ : (मोकळेपणाने) मस्त! बाहेर आहेस की तूसुद्धा घरातच?
आदूदादा : (गोरेमोरे होत) तू सुद्धा घरातच म्हंजे? आणखी कोण घरात बसतं?
अमूबाळ : (निरागसपणाने) सगळेच घरात असतात ना? म्हणून विचारलं!!
आदूदादा : (हायसे वाटून) हां, हां! मला वाटलं की टोमणा मारतोयस!!
अमूबाळ : दिवसभर इलेक्शनचे निकाल आणि संध्याकाळी आयपीएलची मॅच…सारखं टीव्हीसमोर बसून डोकं दुखायला लागलंय!!
आदूदादा : (गंमतीदार खुलासा करत) म्हंजे दिवसभर तू चेन्नईची मॅच बघत होतास, मी बंगालची मॅच बघत होतो…
अमूबाळ : (खुदकन हसत) वेल सेड! मी हे सोशल मीडियावर टाकू?
आदूदादा : (दिलदारपणाने) टाक की! पण बंगालच्या मॅचमध्ये त्या मोदीजींनी आणि अमितभाई शहाजींनी चिक्कीखाऊपणा केला! अंपायरिंग एकदम फ्रॉड होतं, अनेक चुकीचे डिसिजन्स दिले, म्हणून रिझल्ट असा लागला…मी सांगतो, या कमळवाल्यांना बंगाली लोक कधीही स्वीकारणार नाहीत!
अमूबाळ : (निरागसपणाची कमाल) पण स्वीकारलं म्हणूनच ते जिंकले ना?
आदूबाळ : (विषय बदलत) बंगालचं जाऊ दे, तू तमिळनाडूचं सांग!
अमूबाळ : (चेन्नईत अडकल्यागत) मी मात्र दिवसभर ‘व्हीसल पोडु’ करत होतो!! मजा आली!! (सळसळत्या उत्साहात) तमिळनाडूतल्या थलपती विजयचा विजय बघून मला स्फुरण चढलंय, आदूदादा!! जिंकायचं तर हे असं जिंकायचं!! काय भारी एण्ट्री यार!!
आदूदादा : (दिलासा देत) तूसुद्धा एक दिवस अस्साच जिंकशील!! मेहनत करते रहो!!
अमूबाळ : (धाकटेपणाने) मी कशाला? आदूदादा, तू असा जिंकायला हवास!! दणक्यात! सगळे विरोधक चीची करत पळाले पाहिजेत!! साऊथच्या सिनेमात एक हिरो, चाळीस गुंडांना हवेत उडवतो, तस्सं!!
आदूदादा : (भाव खात) मला हे अशक्य नाही, पण त्याला अजून वेळ आहे!! हरेक चीज का टाइम होता है…
अमूबाळ : (निरागसतेचा कळस…) हिंदीत नको ना बोलूस, आदूदादा! बाबा रागावतात!!
आदूदादा : थोडंसं बोलायचं रे हिंदी! तुझे बाबा, आय मीन माझे काका नेहमीच रागावलेले असतात!! माझे बाबा, आय मीन तुझे काका, अधूनमधून किती छान विनोद करतात!!
अमूबाळ : (गंभीर होत) माझे बाबा, आय मीन तुझे काका, म्हणाले की साऊथमध्ये कोणीही हिंदी बोलत नाही तरी ते किती सॉल्लिड जिंकतात! जरा राजकारण शीक!!
आदूदादा : (सावध होत) असं म्हणाले तुझे बाबा, आय मीन माझे काका?
अमूबाळ : (खुलासा करत) येस, किंबहुना त्यांच्या मते थलपती विजयचा विजय केवळ हिंदी बोलत नसल्यामुळेच झाला! तमिळनाडूत हिंदी चालत असतं तर आज तिथे कमळवाले पोचले असते कधीच!!
आदूदादा : (प्रगल्भ दाद देत) पॉइंट इज व्हॅलिड!! पण साऊथमध्ये असंच चालतं, त्याला काय करणार? आपल्याकडे जरा वेळ लागतो! लेकिन एक दिन अपना भी दिन आयेगा!!
अमूबाळ : (बजावून सांगत) पुन्हा हिंदी?
आदूदादा : (आपलंही घोडं दामटत) माझे बाबा, आय मीन तुझे काका म्हणाले की टॉपची खुर्ची मिळवणं ही काही कठीण गोष्ट नाही! अडीच वर्षं ती खुर्ची त्यांच्याकडेच होती ना!!
अमूबाळ : (छातीठोकपणाने) आदूदादा, एक ना एक दिवस तू महाराष्ट्राची टॉपची खुर्ची मिळवणार! बघच तू!!
आदूबाळ : (लाजत) थँक्यू!! मी नाही तर तू!! ओके?