पुणे - चारित्राच्या संशयातून पत्नीचे दोन्ही हात-पाय आणि शिर कुऱ्हाडीने धडावेगळे करून ते हातात घेऊन फिरणाऱ्या पतीला न्यायालयाने जन्मठेप आणि सात हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुमीत जोशी यांनी हा निकाल दिला.
रामचंद्र शेहू चव्हाण (वय-६३, रा. सुखसागरनगर, कात्रज, मूळ रा. उरनूर, गुलबर्गा, कर्नाटक) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने पत्नी सोनाबाई चव्हाण (वय ५५) हिचा ९ ऑक्टोबर २०१५ ला सकाळी अकरा ते सव्वाअकरा दरम्यान निर्घृण खून केला होता. या प्रकरणी आरोपीची सून सुनीता रमेश चव्हाण हिने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. चव्हाण हा सुरक्षारक्षक म्हणून काम करायचा.
पत्नीच्या चारित्र्यावरील संशयातून दोघांमध्ये भांडणे व्हायची. त्या रागातून त्याने पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला करून तिचा खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह लाकडी ओंडक्यावर ठेवून त्याने कुऱ्हाडीने पत्नीचे दोन्ही हातपाय आणि शिर तोडले. पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने रक्तरंजित शिर आणि कुऱ्हाड हातात घेऊन तो पायी चालत कात्रज तलावाच्या दिशेने निघाला होता. त्या वेळी गस्तीवरील पोलिस अंमलबजाराने आरोपीला अडवून त्याच्या हातातील शिर आणि कुऱ्हाड ताब्यात घेत अटक केली.
या खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील प्रेमकुमार अग्रवाल यांनी काम पाहिले. गुन्हा सिद्ध करण्यासाठी त्यांनी सरकार पक्षातर्फे २४ साक्षीदार तपासले. घटनेची प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेली आरोपीची सून, शेजारी राहणारे कुटुंबीय, शाळकरी मुलगी आणि चहाविक्रेत्या महिलेची साक्ष महत्त्वाची ठरली. आरोपीच्या सुनेने सासऱ्याला सासूच्या मानेवर कुऱ्हाडीने घाव घालताना पाहिले. सासूला वाचविण्याचा प्रयत्न करताना तिचे रक्त सुनेच्या कपड्यावर उडाले होते.
जपानमधून येऊन न्यायालयासमोर साक्ष नोंदविली -
शेजारच्या इमारतीत राहणाऱ्या कुटुंबाने घराच्या बाल्कनीतून ही घटना पाहिली होती. त्यापैकी एका साक्षीदाराने आरोपीला मृत महिलेचे शिर आणि रक्ताने माखलेली कुऱ्हाड हातात घेऊन जाताना मोबाइलमध्ये चित्रीकरण केले. नोकरीनिमित्त जपानमध्ये स्थलांतरित झालेल्या या साक्षीदाराने जपानमधून येऊन न्यायालयासमोर साक्ष नोंदविली; तर आरोपीच्या घरासमोर मोकळ्या जागेत शाळेत जाण्यासाठी थांबलेल्या एका नऊ वर्षांच्या चिमुकलीने आरोपीला न्यायालयासमोर ओळखले.
आरोपीचा कबुलीजबाब न्यायालयात सिद्ध -
घटनेनंतर आरोपी एका हातात शिर व दुसऱ्या हातात कुऱ्हाड घेऊन चालला होता. त्यावेळी एका चहाविक्रेत्या महिलेने पाहिले. तिने त्याला ‘अण्णा, कुठे बकरू कापले’ अशी विचारणा केली. त्यावर आरोपीने ‘बायकोला मारले’ असे सांगितल्यावर त्या घाबरल्या. आरोपीने दिलेला हा न्यायबाह्य कबुलीजबाब सरकार पक्षाने न्यायालयात सिद्ध केला.