साळवा : नागपूरच्या कुही तालुक्यातील बोरी नाईक शिवारात सुरू असलेल्या अवैध मुरूम उत्खननावर महसूल विभागाने मध्यरात्री धाडसी कारवाई करत मोठी खळबळ उडवली. नायब तहसीलदार बुद्धभूषण निकाळजे यांनी जीवाची पर्वा न करता धावत्या जेसीबीला लटकून तब्बल ३ ते ४ किमी पाठलाग करत वाहन थांबवले. या थरारक कारवाईदरम्यान महसूल पथकाच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचाही प्रयत्न झाला.
मंगळवारी (ता. ५) रात्री ११.३० वाजता छापा टाकण्यात आला असता आरोपींनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. एका ट्रॅक्टर चालकाने थेट निकाळजे यांच्या अंगावर वाहन घालण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी प्रसंगावधान राखत जीव वाचवला. त्याचवेळी एमएच ४० सीक्यू २३८८ क्रमांकाचा जेसीबी वेगाने पळत असताना निकाळजे यांनी त्याला पकडून धावत्या अवस्थेतच लटकून पाठलाग केला. काटेरी झुडपांतून वाहन चालवत चालकाने त्यांना खाली पाडण्याचा प्रयत्न केला, यात निकाळजे जखमी झाले, तरीही त्यांनी पकड सोडली नाही.
या कारवाईत जेसीबी (एमएच ४० सीक्यू २३८८) चालक मयूर थोटे (रा. दहेगाव, सध्या राजोला), ट्रॅक्टर एमएच ४० सीएक्स ६९१८ (मालक मनोहर निरगुडकर, रा. बोरी नाईक) व ट्रॅक्टर एमएच ४० सीक्यू ०५४४ (मालक जयपाल पंढरी तुळसकर, रा. बोरी नाईक) जप्त करण्यात आले. कारवाईत ग्राम महसूल अधिकारी मोहन पवार, आनंद मस्के, महसूल सेवक निलेश तिरपुडे तसेच वेलतूर पोलीस स्टेशनचे एपीआय राऊत व कर्मचारी सहभागी होते. या धडाकेबाज कारवाईमुळे अवैध उत्खनन करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अवैध उत्खनन व महसुलाची चोरी कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही. झिरो टॉलरन्स धोरणानुसार कठोर कारवाई सुरूच राहील. जीवाला धोका निर्माण झाला तरी कायद्याची अंमलबजावणी थांबणार नाही.
- बुद्धभूषण निकाळजे, नायब तहसीलदार.