पुणे : शहरातील राजाराम पूल परिसरात एका तरुणीची छेड काढणाऱ्या मद्यपी तरुणाला संतप्त नागरिकांनी पकडून चांगलाच चोप दिला. भररस्त्यात तरुणीला त्रास देताना पाहून परिसरातील नागरिक आक्रमक झाले होते. या प्रकरणी वारजे पोलिसांनी विनयभंग केल्याप्रकरणी रात्री गुन्हा दाखल केला आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. राजाराम पूल परिसरातून एक तरुणी जात असताना एकाने तिची छेड काढण्यास सुरुवात केली. संबंधित तरुणीने विरोध केला, मात्र तो तिला सतत त्रास देत होता. हा प्रकार रस्त्यावरून जाणाऱ्या काही नागरिकांच्या लक्षात आला.
भररस्त्यात तरुणीची छेड काढली जात असल्याचे पाहून नागरिक घटनास्थळी जमा झाले. तो तरुण पळून जाण्याच्या तयारीत असतानाच काही जणांनी त्याला घेरले. त्यांनी त्या तरुणाला बेदम चोप दिला. वारजे पोलिसांनी त्या तरुणाला ताब्यात घेतले असून, पुढील तपास करण्यात येत आहे.
दरम्यान, वैद्यकीय तपासणीत आरोपीने मद्य सेवन केल्याचे निष्पन्न झाले आहे. या मद्यपी तरुणाविरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच, या तरुणाने तक्रार दिल्यावरून मारहाण करणाऱ्या पाच-सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली.