सोमेश्वरनगर - करंजेपूल (ता. बारामती) येथील भूमिहीन कुटुंबातील रमजान शायदा बाळाभाई शेख याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवत पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे. पोलिस शिपाई म्हणून कार्यरत असताना, कोणत्याही शिकवणीशिवाय त्याने हे यश संपादन केले.
एमपीएससी संयुक्त परीक्षेच्या निकालात रमजानने लेखी परीक्षेत २६० आणि मैदानी चाचणीत १०० पैकी १०० गुण मिळवत राज्यात २८५ वे स्थान पटकावले. त्याचे वडील बाळाभाई शेख गॅस-शेगडी दुरुस्तीचे काम करतात, तर आई शायदा शेतमजुरी करतात. घरची परिस्थिती बेताची असतानाही रमजानने सन २०१७मध्ये राज्य राखीव पोलिस दलात शिपाई म्हणून कारकीर्द सुरू केली.
मात्र, फौजदार होण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्याने नोकरी सांभाळत अभ्यास सुरू ठेवला. सन २०२२च्या परीक्षेत अवघ्या पाच गुणांनी अपयश आल्यानंतरही खचून न जाता त्याने सन २०२३च्या परीक्षेत पूर्ण ताकदीने प्रयत्न केल्याने यश आले. या यशाबद्दल करंजेपूल ग्रामस्थांनी गुलाल उधळून आनंद साजरा केला.